करमाळा येथील लोकन्यायालयात २३२ प्रकरणे निकाली – १२ कोटी २७ लाख ६८ हजारांची वसुली…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा सोलापूर विधी सेवा समिती अध्यक्ष श्री.आजमी व सचिव नरेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुका विधी सेवा समिती व करमाळा वकील संघ, यांच्या संयुक्त विद्यमानाने अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, करमाळा, तथा दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, न्यायाधीश एम.पी.एखे यांचे अध्यक्षतेखाली करमाळा न्यायालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत २३२ प्रलंबित दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी खटले व दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवली असून त्यात १२ कोटी २७ लाख ६८ हजार २२० रुपयांची वसुली झाली आहे.
या राष्ट्रीय लोकन्यायालयाचे उद्घाटन करमाळा न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायाधीश एम.पी.एखे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आर.ए.शिवरात्री, सहदिवाणी न्यायाधीश बी.ए.भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष डी.एम.सोनवणे तसेच वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी न्यायाधीश एखे, न्यायाधीश शिवरात्री, तसेच न्यायाधीश भोसले यांनी आपले लोकअदालती विषयी मनोगत व्यक्त केले.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये करमाळा न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी असे ५७८३ व दाखलपूर्व १९५० असे एकूण ७७३३ प्रकरणे ठेवण्यात येऊन यात दाखल पूर्वमधील २४ प्रकरणे निकाली काढून त्यात ४३ लाख ७६ हजार १५८ रु.व प्रलंबित प्रकरणातील २०८ प्रकरणे तडजोडीने निकाली काढून त्यात ११ कोटी ८३ लाख ९२ हजार ०६२ रु. वसुली झाली. या लोकअदालतीसाठी करमाळा न्यायालयात एकूण दोन पॅनल करण्यात आले होते, त्यात दिवाणी न्यायाधीश एम.पी.एखे व न्यायाधीश बी.ए.भोसले या न्यायाधीशांचे दोन पॅनल करण्यात आले होते. तसेच बँकेच्या व नगरपालिका रिकव्हरीच्या २४ प्रकरणात तडजोड होऊन त्यात ४३ लाख ७६ हजार १५८ रू. ची वसुली झाली. न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र फौजदारी प्रकरणातील ८३ इतकी प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली त्यात सुमारे ५ लाख ३५ हजार ७०० रु.इतका दंड वसूल करण्यात आला. या राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करणे कामी वकील संघाचे सदस्य,सर्व न्यायालयातील कर्मचारी, पोलीस स्टेशन, पोलीस कर्मचारी, बँका तसेच फायनान्स यांचे प्रतिनिधी यांचे विशेष असे सहकार्य लाभले.