करमाळा भूषण चंद्रकांत इंदुरे यांचे निधन
करमाळा : येथील रहिवाशी व पुणे येथे कार्यरत असलेले व ज्यांना करमाळा भूषण पुरस्कार देण्यात आला असे ज्येष्ठ साहित्यिक, माजी प्राचार्य चंद्रकांत इंदुरे (वय-८३) यांचे वृध्दपकाळाने काल (ता. १८) पहाटे राहत्या घरी सांगवी (पुणे) येथे निधन झाले.
चंद्रकांत इंदुरे सर हे हिंदी माध्यमिक विद्यालय पुणे येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. याच विद्यालयात प्राचार्य म्हणून ते १९९९ ला सेवानिवृत्त झाले. त्यांनी संत तुकाराम, महात्मा गांधी यांचेवर पुस्तके लिहिली आहेत. तसेच साने गुरूजी कथामाला त्यांनी शेवटपर्यंत चालवली. महाराष्ट्रातील अनेक गावात, शाळेत, महाविद्यालयात जाऊन साने गुरुजीवरील कथा व व्याख्याने देत असत. पुणे येथील सैनिक स्कुल तसेच न्यु मिलीयम इंग्लीश स्कुल या शाळांवर ते मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. बालसाहित्यिक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याची जाणीव ठेवूनच करमाळा येथील ग्रामसुधार समितीने करमाळा भूषण हा पुरस्कार त्यांना दिला आहे. करमाळा तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार नामदेवराव जगताप यांचे ते साडूभाऊ होते तर माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे ते काका होते. सोमवारी १८ डिसेंबरला पहाटे राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता सांगवी येथील
स्मशानभुमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. अभियंता अनिल इंदुरे व ट्रॅव्हल्स कंपनीचे मालक सतीश इंदुरे यांचे ते वडील होत.