करमाळ्याजवळील अपघातात चार ठार – २० वर्षाच्या कार चालकावर गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.27) : देवदर्शन करण्यासाठी तवेरा गाडीतून निघालेल्या कुंभार परिवाराला अपघाताने घेरले अन् त्यात चौघेजण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात पांडे परिसरात फिसरे गावाच्या वळणाजवळ पहाटे साडेपाचच्या सुमारास घडला आहे. यात २० वर्षाच्या तवेरा गाडीच्या चालकावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यात हकीकत अशी, की शशीकुमार चंद्रशहा कुंभार व त्यांच्या परिवारातील आठजण देवदर्शनासाठी म्हणून महादेवनगर, बनशंकरी शाळेजवळ गुलबर्गा येथून काल (ता. २६) रात्री ते तवेरा कार क्र. के. ए. ३२ एन ०६३१ मधून निघाले होते.
पहाटे साडेपाचच्या सुमारास कार चालकाचा कारवरील ताबा सुटला व सदरची तवेरा गाडी डाव्या बाजुने कंटेनर क्र.आर.जे.०६ जीसी २४८६ यावर जाऊन धडकली. त्यानंतर सदरची तवेरा पलटी होऊन रस्त्याच्या खाली चेंदामेंदा होऊन पडली आहे. यात १) श्रीशैल चंद्रशहा कुंभार (वय-५६), २) सौ. शशिकाला श्रीशैल कुंभार (वय ५०) दोघे रा.बनशंकरी शाळेजवळ, महादेवनगर, गुलबर्गा ३) सौ. ज्योती गुरूदेव हुनशालमठ ( वय – ३८, रा. बागलकोट) ४) श्रीमती शारदा गंगाधर हिरेमठ (वय ६७, रा. हुबळी) यांचे जागीच निधन झाले आहे.
यात सौम्या श्रीधर कुंभार (वय – २६), कावेरी विश्वनाथ कुंभार (वय २४), शशिकुमार त्रिशाला कुंभार (वय ३६), श्रीदार श्रीशैल कुंभार ( वय ३८), नक्षत्रा विश्वनाथ कुंभार (वय – ८ महिने) व चालक श्रीकांत राजकुमार चव्हाण ( वय – २०) यांचे वरती उपजिल्हा रूग्णालयात डॉ. गजानन गुंजकर व डॉ.राहुल कोळेकर यांचे मार्गर्शनाखाली उपचार चालू आहेत.


या प्रकरणी शशीकुमार श्रीशैल कुंभार (रा. गुलबर्गा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की कार चालक श्रीकांत राजकुमार चव्हाण याने रस्त्याची परिस्थिती न पाहता भरधाव वेगात गाडी चालवून कंटेनरला धडक देऊन गाडीचा अपघात केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बंडगर हे करत आहेत. घटना घडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील तसेच पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

कारचालक हा अवघा २० वर्षाचा असून त्याला मे २०२३ मध्ये गाडी चालविण्याचा परवाना मिळाला आहे. चालकाच्या दुर्लक्षितपणामुळे हा अपघात घडल्याबाबत प्रथमदर्शनी दिसून येते. तवेरा गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अन्य जखमींना येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात ८-९ महिन्याचे बाळ सुदैवाने वाचले आहे..




