कोकरे यांच्या रेड बनाना उत्पादनाला सोलापूर कृषी प्रदर्शनात द्वितीय क्रमांक
करमाळा (संदेश प्रतिनिधी ) – सिद्धेश्वर देवस्थान,सोलापूर कृषी विभाग, आत्मा सोलापूर व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 53 वी राज्यस्तरीय सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन 28 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 दरम्यान सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते.
या कृषी प्रदर्शनात विविध शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उत्पादित फळे, फुले, भाजीपाला, कडधान्य, अन्नधान्य प्रदर्शित केली होती. यामध्ये करमाळा तालुक्यातील कुगाव येथील शेतकरी महेश धुळाभाऊ कोकरे यांनी आपल्या शेतात तयार केलेली लाल केळी (रेड बनाना) प्रदर्शनात नुमना म्हणून स्पर्धेसाठी ठेवली होती. या स्पर्धेतून कोकरे यांच्या उत्पादनाला (लाल केळी) द्वितीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले. त्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर दत्तात्रय गावसाने यांच्याकडून प्रशस्तीपत्रक देण्यात आले. त्यांच्या या उत्पादनाला द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचे करमाळा तालुक्यातून विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.