देवळात देव नाही तर घरातील आई-बाप हेच देव : वसंत हंकारे
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : मंदिरात जाऊन तुम्हाला देव भेटणार नाही किंवा देवी भेटणार नाही. परंतु घरातील आई-बाप हेच तुमचे देव आहेत हे विसरू नका. त्यांची वेळीच काळजी घ्या आणि आपल्या बापाची मान खाली जाणार नाही याकडे लक्ष द्या; असे मत प्रसिध्द व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्त केले.
ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात न समजलेले आई-बाप या विषयावर श्री. हंकारे हे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, की बालाजी किंवा शिर्डीला जाऊन तुम्ही लाखो रूपये वाहिलेतरी तो देव तुम्हाला तुमचा बाप परत देणार नाही. त्यामुळे आपल्या बापाची किंमत आपण करा. आपल्या बापाची मान खाली जाणार नाही व त्याला सन्मानाने समाजात जगता येईल, असे आपले वागणे ठेवा व आपली प्रगती करा. असे मत श्री. हंकारे यांनी व्यक्त केले. यावेळी अनेक मुली आपल्या वडिलांच्या गळ्यात गळा घालून रडत असतानाचे चित्र या सभेत दिसून आले.
यावेळी ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.महेश निकत यांनी विविध क्षेत्रातील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार केले. यामध्ये हर्षदा जमदाडे (मांगी), शंभुराजे घोरपडे, सिध्दांत धोकटे ( जेऊर), गौरी गाडेकर (करमाळा), अफताब सय्यद (चिखलठाण), जयदीप एकाड (सावडी), साक्षी मिसाळ, शौर्य शिंदे, तेजस्विनी कावले, अजिंक्य शिंदे, सूरज शिंदे (कुंभेज) यांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, ज्येष्ठ कवी प्रका लावंड, माजी प्राचार्य नागेश माने, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, माण येथील अभयसिंह जगताप, टायगर ग्रुपचे तानाजी जाधव, माजी प्राचार्य जयप्रकाश बिले, माजी उपसभापती दत्तात्रय सरडे, मनसे तालुका अध्यक्ष संजय घोलप, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष वारे, प्रा. लक्ष्मण राख, माजी नगरसेवक अतुल फंड, विनय ननवरे आदीजण उपस्थित होते.