शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश – जनशक्ती संघटनेच्या मागणीला यश – अतुल खूपसे पाटील
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : राज्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. निसर्गाच्या गारपीट आणि अवकाळी सारख्या संकटांना तोंड देऊन दिवस-रात्र कष्ट करून द्राक्ष पीक मोठ्या कष्टाने घेत असतात. यातील काही द्राक्ष मार्केटिंगला जाते तर बहुतांश द्राक्ष बेदाण्यासाठी वापरली जाते. मात्र राज्यामध्ये बेदाणा निर्मिती प्रक्रिया भरपूर असल्याने आणि म्हणावी तशी निर्यात नसल्याने शेतकऱ्यांच्या बेदाण्याला योग्य भाव मिळत नव्हता, यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये शालेय पोषण आहाराच्या पोषणामध्ये बेदाण्याचा समावेश व्हावा अशी मागणी जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी राज्य शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली होती. या मागणीला यश आले असून प्राथमिक शाळांमध्ये शालेय पोषण आहारामध्ये अंडी केळी याचबरोबर आता बेदाणा देखील देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी अध्यादेश काढला आहे.
यावेळी बोलताना अतुल खूपसे-पाटील म्हणाले की, शेतकरी हा आर्थिक अडचणींचा सामना करत शेतातील वेगवेगळी पिके घेत असतो. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संकटांना तोंड देतो, अवकाळी पाऊस, गारपीट यामध्ये त्याला खूप अलर्ट राहावं लागतं. वर्षभर मोठ्या कष्टाने घाम गाळून पिकवलेलं पीक एका रात्रीत देशोधडीला लागतं. अशावेळी देखील तो न खचता पुन्हा तयारीला लागतो. एवढं करून देखील त्याच्या पदरात काय पडेल हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाही. त्यामुळे त्याच्या बेदाण्याला योग्य दर मिळावा यासाठी जनशक्ती संघटनेने शालेय पोषण आहारामध्ये बेदाण्याचा समावेश राज्य शासनाला निवेदन दिले होते. शिवाय यासाठी अनेक वेळा पाठपुरावा देखील केला. त्यामुळे राज्य शासनाकडून शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करण्याचा अध्यादेश काढला आहे.
ही बाब राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची असून यामुळे शासनाकडून बेदाणा खरेदी प्रक्रियेला वेग येणार आहे. मात्र शासनाने यासाठी शेतकऱ्यांकडून योग्य दराने बेदाणा खरेदी करणे तितकेच गरजेचे असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी नितीन बापू कापसे शर्मिला नलवडे रोहन नाईकनवरे हनुमंत कानतोडे सुनील नगरे किरण जाधव अक्षय देवडकर गणेश वायभासे,विठ्ठल मस्के,अतुल राऊत,बिभीषण शिरसट,शरद एकाड,दिपाली डिरे,पांडू
भोसले,बालाजी तरंगे,औदुंबर सावंत,रेश्मा राऊत,राणा वाघमारे,किशोर शिंदे,रामराजे डोलारे,बंडू शिंदे आदीजन उपस्थित होते.