जुन्या पेन्शन संघटनेची १९ फेब्रुवारीपासून नागपूर ते मुंबई संकल्प यात्रा
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट पेन्शन योजना लागू करावी यासाठी १९ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान नागपूर ते मुंबई अशी संकल्प यात्रा काढणार आहे अशी माहिती जुनी पेन्शन संघटनेचे सोलापूर जिल्ह्याचे नेते तात्यासाहेब जाधव यांनी साप्ताहिक संदेशला दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट पेन्शन योजना लागू करावी यासाठी विविध आंदोलने केलेली आहेत. शासनाकडून जुनी पेन्शन लागू करावी यासाठी आश्वासन देण्यात आलेले आहे परंतु अद्याप यासाठी कोणताही अध्यादेश निघालेला नाही त्यामुळे जोपर्यंत जुनी पेन्शन मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही, असा संकल्प करून ही आम्ही संकल्प यात्रा काढण्यात आलेली आहे.
असा असेल संकल्प यात्रेचा नागपुर ते मुंबई चा प्रवास
19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता नागपुर येथून ही संकल्प यात्रा सुरू होईल व पुढे तळेगाव वर्धा , अमरावती,वाशिम, यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सिंदखेड राजा, छ.संभाजी नगर, अहमदनगर, पुणे,नाशिक,पालघर,ठाणे या मार्गे आझाद मैदान मुंबई येथे दि 28 फेब्रुवारी रोजी पोहोचेल अशी माहिती सोलापूर जिल्हा जुनी पेंशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री रामराव शिंदे यांनी दिली.
शासनाने कुठलाही भेदभाव न करता सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अन्यथा व्होट फॉर ओ पी एस हे एकमेव असे साधन आमच्याकडे शिल्लक राहणार आहे आणि याची प्रचिती अनेक राज्यांमध्ये आलेली आहे.
– वितेश खांडेकर, राज्याध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना