जि.प. खडकी शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद झाला द्विगुणित!
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील खडकी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीच्या परतीच्या वाटेवर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये जेवण व शैक्षणिक साहित्य भेट म्हणून मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी या शाळेच्या शैक्षणिक सहलीचे नियोजन दि. २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत केले होते. या शैक्षणिक सहलीत वाई येथील गणपती, महाबळेश्वर मधील प्रेक्षणीय स्थळे,महाड येथील चवदार तळे, स्वराज्याची राजधानी रायगड, पाचाड येथील जिजाऊंचा राजवाडा, पाचाड येथील जिजाऊंचे समाधी स्थळ,कोकण किनारपट्टीवरील दिवेआगार बीच, दिघे ते आगर दंडा येथीलअनुभव, मुरुड जंजिरा सागरी किल्ला अशा विविध स्थळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीचा आनंद घेतला. सुमारे ५५ विद्यार्थ्यांनी या सहलीत सहभाग घेतला होता.
शेवटी सहलीच्या परतीच्या वेळी पुणे येथील उद्योजक व खडकी ग्रामपंचायतीचे सदस्य, शाळेचे माजी विद्यार्थी अशोक देशमुख यांनी सहलीतील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना पुणे येथील नामांकित हॉटेलमध्ये जेवण देण्याची इच्छा मुख्याध्यापक विलास शिराळ यांच्याकडे व्यक्त केली व तसे आमंत्रण दिले. यावेळी वेळेचा अभाव होता तरी देखील आपल्या माजी विद्यार्थ्याच्या आग्रहाचा मान राखण्यासाठी मुख्याध्यापक शिराळ यांनी देशमुख यांचे आमंत्रण स्वीकारले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे देशमुख परिवाराने उत्साहात स्वागत केले. सर्वांना हॉटेलमधील स्वादिष्ट जेवण दिले त्याबरोबरच जाताना प्रत्येक विद्यार्थ्यांला शैक्षणिक साहित्य भेट म्हणूनही दिले. झालेल्या पाहुणचारानंतर विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला होता. यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक वर्गाने अशोक देशमुख त्यांचा परिवार, सहकारी शिंदे यांचे आभार मानले.