पांडे येथे जुगार खेळणाऱ्या आठ जणाविरूध्द कारवाई – दीड लाख रूपयाचा ऐवज जप्त..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : पांडे येथे जुगार खेळणाऱ्या आठ जणाविरूध्द पोलीसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून १ लाख ५२ हजार ८४५ रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. हा प्रकार २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता घडला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शेखर शहाजी बागल यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, की पांडे येथे काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती समजल्यावर आम्ही तिथे छापा टाकला असता, तिथे सतीश बळीराम दुधे, किसन मधुकर भोसले, सुभाष मुरलीधर भोसले (सर्व रा.पांडे) हे जागेवर सापडले तर रमेश तुकाराम मोहोळकर, रफिक जाफर पठाण, ईलाही कमूलाल मुलाणी, भाऊराव शेवराव भोसले व वेताळ उर्फ काबूल रामदास लांडगे (सर्व रा. पांडे) हे पळून गेले.
ते सर्वजण पत्त्याच्या पानावर पैसे लावून जुगार खेळत होते. त्यांच्याकडे जुगाराचे साहित्य, रोख रक्कम २ हजार ८४० रूपये व दीड लाख रूपयाच्या तीन मोटारसायकली सापडल्या आहेत. असा एकूण त्यांच्याकडून १ लाख ५२ हजार ८४५ रूपयाचा ऐवज सापडला आहे. या प्रकरणी पोलीसांनी या आठजणाविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहुरकर हे करत आहेत.