पाणी फाउंडेशनचा राज्यस्तरीय ‘फार्मर कप’ स्पर्धेचा प्रथम पुरस्कार कुंभारगाव येथील शेतकरी गटाला प्रदान

करमाळा (सुरज हिरडे) – अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा २०२३ चा सत्यमेव जयते ‘फार्मर कप २०२३’ चा पुरस्कार करमाळा तालुक्यातील कुंभारगाव ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी या शेतकरी गटाला मिळाला आहे. राज्यातील ३००० गटातून त्यांची निवड झाली आहे.
आज (दि. २९ फेब्रुवारी) रोजी मुंबई येथे दिमाखदार सोहळ्यात विविध शेतकरी गटांना हा पुरस्कार देण्यात आला. यातील प्रथम पुरस्कार कुंभारगाव गटाला मिळाला आहे. अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते हा पुरस्कार कुंभारगाव ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी या शेतकरी गटाला देण्यात आला. यात या गटाला १५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. कुंभारगाव ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी या शेतकरी गटाचे तालुक्यातून विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

सत्यमेव जयते फार्मर कप ही शास्त्रशुद्ध व शाश्वत शेतीमध्ये सर्वोत्तम काम करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी गटांमधील स्पर्धा आहे. गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. शेतकरी गटशेतीच्या माध्यमातून एकजुटीने उत्पादन खर्च कमी करू शकतील आणि शास्त्रशुद्ध पद्धतींचा अवलंब करून उत्पादन वाढू शकतील असा या स्पर्धेचा उद्देश आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील सुमारे ३००० शेतकरी गट तयार करण्यात आले आहेत.
संपूर्ण कार्यक्रमाची व्हिडीओ लिंक : https://www.youtube.com/live/zCb_9LKZS9U?si=d38UTgs3d8xPRnm2

