सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांना राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील भटके विमुक्त जाती व आदिवासी ज्ञानपीठ स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांना सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य परिषद, सोलापूरच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय महात्मा फुले सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सोलापूर येथे डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित सहाव्या सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य व सांस्कृतिक संमेलनात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक दत्ता गायकवाड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून माने यांना सन्मानीत करण्यात आले.
याप्रसंगी संयोजक मुक्ता साळवे साहित्य परिषदेचे संस्थापक सचिन बगाडे, निमंत्रक यशवंत फडतरे, श्रीमंत जाधव, साहित्यिका लक्ष्मी यादव, डॉ. प्रा. वनिता चंदनशिवे, ज्येष्ठ विचारवंत अशोक आगवणे, परकाचे लेखक लालासाहेब जाधव आदि उपस्थित होते.
माने हे गेल्या तीस वर्षांहून अधिक काळापासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांनी उभारलेल्या एकलव्य आश्रमशाळेमुळे भटक्या विमुक्त, जाती – जमातीतील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. त्यांच्या या शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेवून सामाजिक पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती.