गौंडरे येथे ग्रामस्थांनी एकत्र येत नकारात्मक गोष्टींची केली होळी
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : गौंडरे (ता.करमाळा) येथे काल (दि.२४) होळीनिमित्त ग्रामस्थांनी एकत्र येत गावात जनजागृती फेरी काढत व नकारात्मक गोष्टी जाळून होळी साजरी केली. यात गावातील प्लास्टिक, व्यसनाच्या वस्तू तसेच नकारात्मक गोष्टींचे फलक तयार करून जाळण्यात आले.
गौंडरे गावातील लहानांपासून जेष्ठापर्यंत अनेकांनी या होळीमध्ये सहभाग घेतला होता. दारू,गुटखा, मावा,गांजा तंबाखू,मटका, झुगार अशा व्यसनाच्या गोष्टींपासून तरुणांनी दूर राहात आपले आरोग्याचे, आयुष्याचे नुकसान होण्यापासून वाचवावे तसेच आळस,अहंकार, निराशा, गर्व, भ्रष्टाचार, जातीभेद, व्यभिचार अशा मानवी नकारात्मक, चुकीच्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवून आपले जीवन सुंदर बनवावे असा संदेश देत ग्रामस्थांनी फलक हातात घेत जनजागृतीची फेरी गावातून काढली.
यावेळी गौंडरे जि.प शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विजय खंडागळे, जि . प . प्राथ शाळा शिक्षक भास्कर अंबारे गुरुजी , कानिफ हनपुडे, गुरुजी पंडीत हनपुडे,बापू तांबोळी बन्सीभाऊ उघडे, मसाजी गायकवाड यांच्यासह गावातील आबालवृद्ध ही होळी साजरी करताना सामील झाले होते.