कुत्र्याला का मारतोस.. असे विचारल्यावरून चौघांकडून एकास बेदम मारहाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : कुत्र्याला का मारतोस असे विचारल्यावरून चौघा जणांनी एकास मारहाण केली आहे. हा प्रकार २६ मार्चला रात्री साडेबारा वाजता चिखलठाण येथील शिंगटे वस्तीवर घडला आहे. या प्रकरणी अक्षय दत्तात्रय शिंगटे ( रा. चिखलठाण) यांनी ६ एप्रिलला फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की आमच्या घराच्या जवळ भवानी मातेचे मंदिर आहे. तिथे ओंकार रोकडे, दिनेश बोराडे, अमित गुंजाळ, तुषार रोकडे हे बसले होते. त्यातील तुषार रोकडे याने कुत्र्याला दगड मारला होता. त्याला कुत्र्याला का मारतोस असे विचारल्यावरून त्याने व त्याच्या मित्राने येऊन मला शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. माझा मोबाईल फोडून नुकसान केले. तसेच भाऊ व आई-वडील सोडविण्यास आले असता त्यांनाही मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे हे करत आहेत.


