या कडक उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांचीही काळजी घ्या!
नैसर्गिक स्रोत आटल्याने प्राणी व पक्ष्यांच्या (Birds) पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला असून, हा प्रश्न कोणी व कसा सोडवावा आणि हे ते अबोल पक्षी कोणाला आणि कसे सांगणार, असा प्रश्न आहे. उन्हाळ्यात मनुष्यप्राणी उष्णतेवर मात करू शकतो.पंखे, कूलर, वातानुकूलन यंत्रे सुरू करून, फ्रीजमधील ‘चिल्ड’ पाणी पिऊन तो आपल्या परिवारासह ‘रिलॅक्स’ आहे. बाहेर मात्र पक्षी पाण्याच्या एका थेंबासाठी तडफडताना दिसत आहे. फिरस्ती कुत्री मांजरे सारखे पशु पाण्याच्या शोधात भटकंती करत असतात. पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पाण्याची तहान भागवण्यासाठी पशु-पक्ष्यांची अविरत धडपड सुरू असते. या धडपडीला सुसह्य करून त्यांच्या जिवाला थोडासा गारवा देण्यासाठी गरज आहे वाटीभर पाण्याची. प्राणी-पक्षी वाचतील तर निसर्ग टिकेल आणि निसर्ग टिकेल तर आपण टिकू. पक्षी व प्राण्यांसाठी गावात व जंगलातही पाणपोईची गरज आहे.
वाढत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असल्याने फक्त माणसेच हवालदिल होत नसून याचा फटका पक्ष्यांनाही बसत आहे. मात्र, याचे पक्ष्यांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होत असून वेळीच पाणी न मिळाल्याने अनेक पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. दर वर्षी एप्रिल महिन्यापासून उन्हाच्या झळा वाढू लागल्या की पक्षी आजारी पडण्याचे प्रमाण वाढते, उन्हाचा चटका बसू लागल्याने शहरी भागातील पक्ष्यांचे जीवनमान धोक्यात आल्याची भीती जाणकारा व्यक्त करत आहेत.
या तापत्या उन्हामुळे जमिनीतील पाण्याचा गावाकडे तलाव, विहिरी, लहान-मोठी पाण्याची डबकी किंवा उघड्यावर पाणी भरून ठेवलेले असते. त्यामुळे प्राणी, पक्षांची तहान भागते. मात्र, शहरात काँक्रिटच्या जंगलात वास्तव्य करणाऱ्या पक्ष्यांना पाणवठे आणि जलस्रोत सापडत नाहीत त्यामुळे उपाशीपोटी उडत असताना अशक्तपणामुळे ते जमिनीवर कोसळतात. पोटात अन्न नसल्याने उडण्याची शक्ती त्यांच्याकडे नसते. रस्त्यावर पडणाऱ्या या पक्ष्यांना कावळे, शिकारी पक्षी आणि भटकी कुत्री मारण्याचा प्रयत्न करतात.
- पशु–पक्ष्यांसाठी काय कराल ?
- घर अथवा इमारतीवर पाण्याची भांडी ठेवावीत.
- ही पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत तसेच त्यातील पाणी काही काळाने बदलणे आवश्यक आहे.
- या काळात इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नका व शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवा.
- घराच्या खिडकीत, गॅलरीत, बागेमध्ये, सोसायटीच्या भिंतींवर कोपऱ्यांत पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करता येईल.
- शक्यतो स्टीलचे भांडे ठेवणे टाळा, कारण ते पटकन गरम होतं आणि पाणीही तापतं.
- नर्सरीमध्ये अलीकडे मातीची पसरट भांडी मिळतात. पक्ष्यांना पाणी पिणे सोयीस्कर ठरते. ही मातीची भांडी शक्यतो सावलीत ठेवावीत.
- आपण जे खातो ते पक्षीसुद्धा खातात, मात्र त्यात तेल असू नये. घरातील खरकटे, फळांच्या साली असे पक्ष्यांना काहीही चालते. तांदूळ, बाजरी, ज्वारी यांचा भरडा तर उत्तमच.
- एखादा पक्षी जखमी अवस्थेत आढळल्यास त्याला थंड करण्यासाठी पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न करू नका. अशाने त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. कारण पक्षी हे उष्ण रक्ताचे असतात. भोवळ आलेल्या पक्ष्यांना सावलीत नेऊन त्याला ड्राॅपने पाणी पाजून प्रथमोपचार करा
मानवी जीवनात पिण्याच्या पाण्याला महत्व आहे तसेच पशु पक्षांच्या जीवनात ही पाण्याला महत्व पूर्ण स्थान आहे. रानावनात हिंडणारे बागडणारे पशुपक्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी इकडून तिकडे रानोमाळ फिरत असतात अशा पक्षांसाठी उथळ भांड्यात पाणी भरून ते थंड हवेच्या ठिकाणी सावलीला ठेवावे. प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने पक्षांना पिण्यासाठी पाणी ठेवावे.
–संजय सरवदे, घारगाव, ता.करमाळा