माढा लोकसभा मतदारसंघात फलटणमध्ये सर्वात जास्त तर करमाळ्यात सर्वात कमी मतदान
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – माढा लोकसभा मतदारसंघ हा एकूण सहा तालुक्यांचा बनलेला आहे. यामध्ये करमाळा, माढा, सांगोला माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील तालुके असून सातारा जिल्ह्यातील फलटण व माण असे दोन तालुके येतात. यंदा या लोकसभा मतदारसंघातून फलटण तालुक्यातून सर्वात जास्त म्हणजे ६७.०५ टक्के मतदान झाले आहे, तर सर्वात कमी मतदान हे करमाळा तालुक्यातून म्हणजे ५५.८४ टक्के इतके मतदान झालेले आहे. इतर मतदारसंघात माढा ६६.४८, सांगोला ६४.१०, माळशिरस ६६.४३, माण ६१.०६ इतके मतदान झाले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण १९ लाख ९१ हजार ४५४ मतदार असून त्यापैकी ११ लाख ९२ हजार १९० मतदारांनी मतदान केले आहे म्हणजेच सुमारे ६३.६५ टक्के मतदारांनी यावर्षी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केलेले आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख ६६ हजार ८०३ पुरुष मतदार असून १ लाख ५१ हजार ११४ महिला मतदार आहेत तर 11 इतर मतदार आहेत. यापैकी १००३४४ (६०.१६%) पुरुष मतदारांनी मतदान केले असून ७७ हजार १६८ (५१.०७%) महिला मतदारांनी तर इतर ४ जणांनी मतदान केले. मागील वेळी एकूण टक्केवारी ही ६२ टक्के होती तर यावेळी ५५.८४ टक्के आहे.
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये दोन घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील एका व्यक्तीने ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला तर करमाळ्यात एकाने ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन हातोड्याने फोडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने उर्वरित मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडली. यामध्ये केलेले मतदान कंट्रोल युनिटमध्ये सुरक्षितपणे असल्याने याचा मतदान गणने मध्ये कोणताही परिणाम होणार नाही.
करमाळा तालुक्यातील एका मतदारांने मतदान करताना चक्क कांदा सोबत आणला होता. त्याने कांद्यानेच ईव्हीएम चे बटन दाबून मतदानाचा हक्क बजावला व तो व्हिडिओ दिवसभर राज्यभर व्हायरल झाला. करमाळा तालुक्यातील उमरड येथे शंभरहून अधिक हयात असलेल्या मतदारांना मृत (डिलीट) शेरा मारल्याने त्यांना मतदान करण्यापासून वंचित राहावे लागले.
माढा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये एकूण ३२ उमेदवार उभे होते. त्यापैकी खरी लढती महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर व महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात आहे. या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटी मध्ये बंद झाले असून येत्या ४ जूनला निकाल लागणार आहे. माढा मतदारसंघातून कोण खासदार होणार आहे याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे.
संपादन – सुरज हिरडे
चक्क इंग्लंड वरुन येवून ‘चिखलठाण’च्या वैभव गव्हाणे यांनी केले मतदान..