‘कुगाव’जवळ वादळी वाऱ्याने ‘उजनी’तील प्रवासी बोट उलटली – सहा जण बुडाले
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.21) : कुगाव (ता.करमाळा) येथून इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे प्रवासी वाहतूक करणारी लाँच (बोट) पलटल्याची घटना आज (ता.21) सायंकाळी घडली आहे. या घटनेत करमाळा तालुक्यातील झरे येथील जाधव कुटुंबातील चार सदस्य बुडाले असून कुगाव येथील 2 जण बुडाले आहेत. याच बोटीतील एकाने पोहत जावून आपला जीव वाचविला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हकीकत अशी की, आज (ता.21) सायंकाळी करमाळा तालुक्यातील एका कुटुंबातील सदस्य उजनीतील बोटीने पाण्याच्या मार्गाने इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील आपल्या पाहुण्यांच्या कार्यक्रमानिमित्त निघाले होते. कुगाव ते कळाशी प्रवासी वाहतूक करणाऱ्या लाँचद्वारे पो.उ.नि. राहूल डोंगरे यांच्यासह एक महिला, तीन पुरुष आणि दोन लहान मुले असे एकूण ७ जणांचा हा प्रवास सुरू होता. सदर लाँच (बोट) कळाशी हद्दीत आल्यानंतर अचानक सुटलेल्या वादळ वाऱ्याने हेलकावे खात बुडाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लॉन्च बुडाल्यानंतर पो.उ.नि. डोंगरे यांनी पोहत जाऊन कळाशी गाठून तिथे या अपघाताबाबत माहिती दिली.
बोट उलटून बुडालेल्यांची नावे –
- गोकुळ दत्तात्रय जाधव वय 30
- कोमल गोकुळ जाधव वय 25
- शुभम गोकुळ जाधव वय दीड वर्षे
- माही गोकुळ जाधव वय तीन वर्ष
- वरील सर्व रा.झरे (ता. करमाळा)
- अनुराग अवघडे वय २८ , कुगाव (ता. करमाळा)
- गौरव धनंजय डोंगरे वय २४, कुगाव (ता. करमाळा)
या घटनेची माहिती मिळताच कळाशी येथील रयत क्रांती संघटनेचे निलेश देवकर यांच्यासह बचाव कार्यास सुरुवात केली असून इंदापूर पोलीस आणि बचाव पथकानेही घटनास्थळी धाव घेतली असून, रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. याबाबत जादा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.