पाऊस झाल्याने बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग – मात्र बियाणे दुकानादाराकडुन शेतकऱ्यांची प्रचंड लुट..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सध्या करमाळा तालुक्यासह राज्यात सर्व दूर पावसाला सुरुवात झाली असून, सर्वत्र समाधानकारक पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची बियाणे पेरण्यासाठी लगबग सुरू झाली असून या बियाणांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे, सध्या दुकानदार बियाणांच्या किमतीपेक्षा दुपटीने किंवा तिपटीने पैसे घेत आहेत, तसेच दिवसभरात बियाणाच्या पिशवीची किंमत दोन ते तीन वेळा बदलली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची ही होणारी लूट प्रशासनाने तातडीने थांबावी अशी मागणी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
करमाळा तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला असल्याने तुर, उडीद, मका, सोयाबिन, अशा विविध बी बियाण्याची खरेदी शेतकरी करू लागले आहेत, याचा फायदा घेत दुकानदार बियाण्यांच्या मूळ किमतीपेक्षा जास्त दराने बी बियाणे विकून शेतकऱ्यांची लूट करत आहेत. विशेष म्हणजे करमाळा तालुक्यातील कोणत्याही नेत्यांनी यामध्ये लक्ष घातलेले नाही, मागील वर्षी कमी पावसामुळे शेतकऱ्यांना कोणतीही उत्पन्न मिळाले नाही, शेतात पाणी नसल्याने फळबागा जमीनदोस्त झालेल्या आहेत, वाढती महागाई त्यामुळे शेतकरी अगोदरच हैराण झालेला आहे, आता कुठे पावसाला सुरुवात झाली आहे, त्यात दुकानदार सध्या बियाणांच्या किमतीत प्रचंड लुट करीत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची लूट त्वरित थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.