करमाळा (संदेश प्रतिनिधी) – ब्रेन डेड झालेल्या ३२ वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी त्याचे अवयवदान केले. यामुळे आठ ते दहा जणांना जीवदान मिळणार असल्याची माहिती मूळचे करमाळ्याचे व सध्या मेडिकल डिरेक्टर म्हणून उष:काल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, सांगली येथे कार्यरत असलेले डॉ.संजय कोग्रेकर यांनी संदेशला दिली. त्यांच्या टीमने तिसऱ्यांदा ब्रेन डेड रुग्णाचे अवयव काढून ग्रीन कॉरिडॉर द्वारा विविध हॉस्पिटलला पाठविण्याची कामगिरी केली आहे.
नितीश कुमार पाटील (वय ३२, रा. दानोळी, जि. कोल्हापूर) असे त्या तरुणाचे नाव आहे. नितीशला बाराव्या वर्षापासून फिटचा त्रास होता. गेल्या रविवारी पुन्हा त्रास जाणवू लागल्याने उष:काल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, सांगली येथे दाखल करण्यात आले. रविवारी रात्री त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. मेंदू मृत (ब्रेन डेड) झाला. या धक्क्यातुन सावरत मृत्यूनंतरही त्याला अवयव रूपाने जिवंत ठेवत कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.
आता त्याचं हृदय एका गरजवंताच्या हृदयात धडधडतय, डोळे कोणालातरी पुन्हा जग दाखवतील. किडनी, लिव्हर, इतरांसाठी उपयोगात येणार असून त्वचा अनेकांना नवी काया देईल.
नितीशच्या मृत्यूनंतर मंगळवारी (दि.१८ जून) रोजी सकाळी दहाच्या सुमारास पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर करून नितीशचे हृदय कोल्हापूर विमानतळाकडे पाठवले. मुंबईतील जसलोक रुग्णालयात एका रुग्णाची हृदयशस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यासाठी नितीशचे हृदय कोल्हापुरातून विमानाने अवघ्या ३८ मिनिटात मुंबईला पाठविण्यात आले. त्याचबरोबर दोन मुत्रपिंडे पुण्यातील बिर्ला व सह्याद्री रुग्णालयांना ग्रीन कॉरिडॉर करून रुग्णवाहिकाद्वारे पाठविण्यात आली. यकृत रुबी रुग्णालयाकडे रवाना झाले. डोळे व त्वचा सांगलीतील रुग्णालयात देण्यात आली.
व्यवस्थापकिय संचालक मिलिंद पारेख, वैद्यकीय संचालक डॉ. आनंद मालाणी, डॉ. संजय कोग्रेकर, अवयवदान फेडरेशनच्या डॉ.हेमा चौधरी, शल्य चिकित्सक विक्रम सिंह कदम या सर्वांनी पुढाकार घेत ही कामगिरी पार पाडली.
सांगलीच्या उष:काल अभिनव इन्स्टिट्यूट हॉस्पिटलला ब्रेन डेड रुग्णाचे अवयव काढून देण्याची परवानगी मिळाली आहे. या रुग्णालयातुन याच आठवड्यात दुसऱ्यांदा ब्रेन डेड व्यक्तीचे हृदय, किडन्या, यकृत, डोळे, त्वचा असे अवयव काढून ग्रीन कॉरिडॉर द्वारा पुणे, मुंबई व इतर हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांना पाठविण्यात आले. मागच्या ४-५ दिवसांपूर्वी ६२ वर्षीय ब्रेन डेड व्यक्तीचे अवयव गरजू रुग्णांना पाठविले. आत्तापर्यंत तीन वेळा ही कामगिरी आमच्या टीमने केली आहे. यात आरोग्य यंत्रणेसह पोलीस यंत्रणेचे आम्हाला सहकार्य लाभले.
– डॉ.संजय कोग्रेकर, मेडिकल डिरेक्टर,उष:काल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, सांगली