कर्जवाटप न करून कर्ज मागणीदारांच्या केलेल्या नुकसानीबद्दल बँकेच्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा येवले यांचा इशारा…

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : युनियन बँक ऑफ इंडियाच्या करमाळा (सोलापूर) शाखेचे शाखाधिकारी बालाजी हारके हे शेतकरी,सुशिक्षित बेरोजगार, महिला आदींसाठी असणाऱ्या विविध योजनांखालील कुठलीच कर्जप्रकरणे मंजूर करत नसल्याबद्दल व कर्जमागणी करणारांना वर्ष-वर्ष हेलपाटे घालायला लावून नाहक आर्थिक भुर्दंड व मन:स्ताप देत असल्याबाबत कर्ज मागणीदारांच्या केलेल्या नुकसानीबद्दल बँक व हारके,शेवाळे यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा विवेक येवले यांनी यावेळी दिला आहे.
याप्रसंगी श्री.येवले म्हणाले कि, यांच्यासह खांबेवाडी, जातेगाव,मांगी येथील कर्जप्रकरणे मंजूर न झाल्याने अडवणूक झालेल्या शेतकरी-ग्रामस्थांनी एकत्रितपणे बँक कार्यालयात येऊन शाखाधिकारी हारके यांना जाब विचारला. यावेळी येवले, शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब सुपनवर, सचिन जव्हेरी, राहुल चोरमले आदींनी विविध प्रश्नांचा भडिमार करून शाखाधिकारी हारके यांना धारेवर धरले.
पीएमइजीपी,सीएमइजीपी सह केंद्र व राज्यशासनाच्या तसेच कृषी व विविध विभागांच्या बेरोजगार,शेतकरी,महिला आदी घटकांसाठी असलेल्या कर्जयोजनांचा लाभ या बँकेमार्फत का दिला जात नाही,तुमच्या नकारात्मक वृत्तीमुळे अनेकजणांना या योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागले आहे, याला जबाबदार कोण ? शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने द्यावे असे शासनाचे परिपत्रक असताना तुम्ही व्याज आकारणी कशी केली ? अशा कुठल्याच प्रश्नांची हारके यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. शाखाधिकारी हारके व नुकतेच येथून बदली झालेले ऍग्री/फिल्ड ऑफिसर शरद शेवाळे यांनी कर्जवाटप न करून कर्ज मागणीदारांच्या केलेल्या नुकसानीबद्दल बँक व हारके,शेवाळे यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा येवले यांनी यावेळी दिला.
यावेळी जातेगावचे अमोल घुमरे,सुनील जगताप, अशोक लवंगारे,राजेंद्र घुमरे,अजय जगताप, सागर माने,शिवाजी तोरडमल,खांबेवाडीचे सुपनवर,राहुल चोरमले,किशोर शिंदे,अण्णासाहेब गोमणे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आशपाक जमादार,मांगीचे ॲड.प्रशांत बागल,तात्यासाहेब काळे-पाटील आदी उपस्थित होते.यावेळी बँकेत अनेक ग्राहक उपस्थित असल्याने हा विषय सर्वत्र चर्चेचा ठरला आहे. १८ जून रोजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व शासकीय विभागांच्या आढावा बैठकीस सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे शाखाधिकारी उपस्थित होते.त्या बैठकीत देखील अनेक जणांनी युनियन बँक व शाखाधिकारी हारके यांच्याविषयी तक्रारी केल्या होत्या.त्यावेळी आमदार शिंदे व तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी फक्त तुमच्याच बँकेविषयी तक्रारी का आहेत असा जाब विचारत व्यवस्थित कामकाज करा अशा सूचना दिल्या होत्या.




