राज्यस्तरीय खरीप पिक स्पर्धेत कुंभारगाव येथील शेतकरी राहुल राऊत यांचा राज्यात दुसरा क्रमांक..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : राज्य शासन आणि कृषी विभाग महाराष्ट्र यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खरीप पिक स्पर्धा २०२३ चा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये खरीप तूर सर्वसाधारण गटामध्ये तालुक्यातील कुंभारगाव येथील शेतकरी राहुल राऊत यांचा राज्यात दुसरा क्रमांक आला आहे.
कृषी क्षेत्रात विविध तंत्रज्ञान, प्रयोगशीलता वापरून उत्पादन वाढविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सदर खरीप पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये खरीप पिकातील तुर गटात राऊत यांनी राज्यामध्ये हे यश मिळविले आहे. त्यांनी कुंभारगाव येथील त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रति हेक्टर मध्ये ४६. ४७ क्विंटल इतके उत्पादन घेतले होते. त्यांची ही कामगिरी द्वितीय क्रमांकाची ठरली. सदर स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथील शेतकरी संजय पोटरे यांनी प्रति हेक्टर ५४ क्विंटल इतके तुर उत्पादन घेत राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. तर लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील सताळा बुद्रुक येथील शेतकरी नंदकिशोर पाटील यांनी प्रति हेक्टर ४५. १० क्विंटल इतक्या तुरीचे उत्पन्न घेतले होते. त्यांचा तिसरा क्रमांक आला.
राऊत यांनी राज्य पातळीवर तूर उत्पादनात यश मिळविले असल्याने त्यांचे कौतुक होत आहे. तालुका कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, मंडळ कृषी अधिकारी देविदास चौधरी, कृषी पर्यवेक्षक उमाकांत जाधव, कृषी सहायक हरिदास दळवी तसेच पाणी फाउंडेशन टीमचे प्रतीक गुरव, आशिष लाड यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणे प्रक्रिया, जैविक खत वापर, शेंडा खोडणे, कीड व्यवस्थापन आदि करुन पिक घेतले. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली. कुंभारगाव ऍग्रो गटाचे अध्यक्ष महेंद्र देशमुख, सदस्य गणेश धुमाळ, रेणुका धुमाळ, संजय पाटील, राहुरीचे कडधान्य प्रकल्प प्रमुख डॉ. नंदकुमार कुटे, डॉ. चांगदेव वायाळ यांनीही भेट देऊन मार्गदर्शन केले होते. असे राऊत यांनी सांगितले.