दळणवळणासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्याने केले उपोषण - Saptahik Sandesh

दळणवळणासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्याने केले उपोषण

करमाळा (दि.२९) –  दळणवळणासाठी रस्ता नसल्याने माढा तालुक्यातील शेतकऱ्याने माढा तहसील कार्यालयासमोर २६ ऑगस्ट रोजी उपोषण केले. यामध्ये तहसीलदारांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हे उपोषण स्थगित केले.

अजिनाथ ऐताळा पवार रा. वेणेगाव टेंभुर्णी ता. माढा जि.सोलापुर असे शेतकऱ्याचे नाव असून या उपोषणाबाबत माहिती देताना ते म्हणाले की, माझी शेती  वेणेगाव टेंभुर्णी येथे असून त्याचा  गट नंबर 141/1, 41/2 हा आहे. शेतातच घर असून मला व माझ्या कुटुंबासाठी दळणवळणसाठी स्वतंत्र असा रस्ता नाही. इतरांच्या शेतातून जाणारा रस्ता त्यांनी अडविल्याने मी या संदर्भात माढा तहसीलदार यांच्याकडे न्यायाची याचिका केली आहे. परंतु ज्यांनी रस्ता आडवला आहे, असे संबंधित लोक सुनावणीस  वेळोवेळी तहसिलदार यांच्याकडे जाणुन बुजून गैरहजर राहत आहेत. त्यामुळे या प्रकरणात गेले कित्येक दिवस झाले कोणतीच कार्यवाही होत नसल्याने आम्हाला दळणवळणसाठी स्वतंत्र असा रस्ता मिळत नाही. यामुळे माझ्या कुटुंबाला अडचणी येत आहे.  माझ्या मुली 12 वी च्या शिक्षणापासुन वंचित राहत आहेत. माझ्या मुली घरी बसुन आहेत.  माझा मुलगा रस्ता नसल्यामुळे दुस-याच्या तालीवरुन जात असताना त्याचा हात मोडला आहे. त्यामुळे मी माढा तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देऊन 26 ऑगस्ट रोजी कुटुंबासह हक्काचा रस्ता मिळत नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करण्यास बसलो.

दिवस भर श्री. पवार व कुटुंबियांनी उपोषण केल्यानंतर माढा तहसीलदार यांनी सदर प्रकरणात लक्ष घालून शेतकरी अजिनाथ पवार यांना येत्या 30 ऑगस्टला  सदर जागेची पाहणी करून दोन्ही पक्षकारांची बाजू जाणून घेऊन योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले. त्यामुळे श्री पवार यांनी आपले उपोषण स्थगित केले.

कार्यवाही करण्याचे आश्वासन तहसील  कार्यालयाकडून देण्यात आले

या उपोषणाला अजिनाथ पवार यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, योगेश आरनाळे, भैरवनाथ शिवणे, आप्पा गवळी, प्रदुम्न राजुरे, अभिजित गवळी, यश काळे,तेजस पवार आदीजन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!