केम येथील तळेकर विद्यालयात भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न
करमाळा (दि.७) – केम येथील महात्मा फुले शिक्षण व विकास मंडळ संस्थेचे संस्थापक स्व. शिवाजी (बापू) तळेकर यांच्या तृतीय पुण्यसमरणार्थ शुक्रवार दि.६ सप्टेंबर रोजी राजाभाऊ तळेकर विद्यालयात भव्य चित्रकला स्पर्धा पार पडली.
ही स्पर्धा तीन गटांमध्ये भरवण्यात आली होती. प्राथमिक गट पहिली ते चौथी लहान गट पाचवी ते आठवी व मोठा गट नववी ते बारावी अशा तीन गटांमध्ये मिळून ३०० हुन अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी लागणारे रंग व इतर साहित्य यावेळी मोफत देण्यात आले. तसेच स्पर्धेनंतर उपस्थित सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले. स्पर्धेसाठी लागणारे साहित्य व खाऊ तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडून वाटप करण्यात आले.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस कॉन्स्टेबल श्री.सातव उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष महेश तळेकर, मुख्याध्यापक मनोज तळेकर, दत्तात्रय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे आयोजन संस्थेच्या वतीने सुशांत सरडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री. गायकवाड यांनी केले. या स्पर्धेतून एकूण १८ विजेत्यांना १० सप्टेंबरला बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती श्री सरडे यांनी दिली. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक यांच्यासह ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शविली.