सीना-कोळगाव धरण भरले १०० टक्के – शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

0

करमाळा (दि.२८)  –  करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील गावांसाठी महत्त्वाचे असलेले सीना-कोळगाव धरण गुरुवारी (दि.२६) दुपारी ३ च्या सुमारास शंभर टक्के भरले असून धरणातुन पुढे विसर्ग सुरू झालेला आहे.

सीना कोळेगाव धरण हे नेहमीच नगर जिल्ह्यातील पावसावर अवलंबून असते यावर्षी देखील नगर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सीना नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात आले. त्याचबरोबर करमाळा तालुक्यात व धरण परिसरात झालेल्या पावसामुळे ५.३ टी. एम.सी क्षमता असलेले कोळगाव धरण काल १०० टक्के भरले. धरण  पूर्ण क्षमतेने भरल्याने काल धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले व ३४७६ क्यूसेक्स ने विसर्ग सुरू झाला. पाण्याच्या फ्लो नुसार दरवाजे कमी जास्त उघडले जात आहेत. या धरणाची साठवण क्षमता १५०.४९ दशलक्ष घनमीटर अशी असून, त्यातून पाणी वापर क्षमता १०५ द.ल.घ.मीटर आहे तर ६१ द.ल.घ. हा मृत साठा मानला जातो. सध्या पाणी पातळी ५०२.८० मीटर इतकी आहे.

सीना कोळगाव धरण

धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा संबंधित विभागाने इशारा दिलेला आहे

उजनी व कोळगाव धरण ही दोन्ही धरणे करमाळा तालुक्यासाठी वरदायिनी आहेत. पाऊस कमी जरी पडला तरी उजनी धरण  हे पुणे जिल्ह्यात होणाऱ्या पावसाच्या पाण्याने दरवर्षी भरत असते परंतु कोळगाव धरण मात्र दरवर्षी होणाऱ्या अपुऱ्या पावसामुळे उपेक्षित राहते. अहमदनगर जिल्ह्यात भरपूर पाऊस झाला तरच हे धरण भरण्याची अपेक्षा केली जाते. २००८ मध्ये पुर्ण झालेले हे धरण मागील १५ वर्षांत ७ वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे.

सीना-कोळगाव धरणाने करमाळा तालुक्यातील ३४०० हेक्टर तर परांडा तालुक्यातील ६८०० हेक्टर क्षेत्र असे एकूण १०२०० हेक्टर क्षेत्र बागायत होऊ शकते. कोळगाव धरणातील पाण्याचा करमाळा तालुक्यातील कोळगाव, आवाटी, निमगाव, गौंडरे, हिवरे, हिसरे, फिसरे, सालसे, साडे अर्जुननगर, बोरगाव, दिलमेश्वर, करंजे, भालेवाडी, वाघाचीवाडी शेलगाव, खांबेवाडी या गावांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

संपादन सूरज हिरडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!