हरवत चाललेल्या माणुसकीच्या काळात महिलेने दाखवला प्रामाणिकपणा- चुकून खात्यावर आलेले ८६ हजार दिले परत - Saptahik Sandesh

हरवत चाललेल्या माणुसकीच्या काळात महिलेने दाखवला प्रामाणिकपणा- चुकून खात्यावर आलेले ८६ हजार दिले परत

करमाळा (दि.१४) –  अलीकडे स्वार्थाची बजबजपुरी माजली आहे. माणसातील माणुसकी हरवत चालली आहे. अशा कालावधीतही समाजात काही प्रामाणिक व इनामदार लोक आहेत. त्यामुळेच समाजातील संस्कृती टिकवून आहे. याची प्रचीती करमाळेकरांना नुकतीच आली आहे. दुसर्‍याचे पैसे आपल्या खात्यावर चुकून आलेले तब्बल 86 हजार रूपये शारदा गवळी व त्यांचा मुलगा वैभव यांनी मुळ मालकाला माजी नगरसेवक संजय सावंत यांचे हस्ते परत दिले आहेत.

यात हकीकत अशी की, निलज येथील शेतकरी संभाजी उत्तम नाळे यांनी मागील हंगामातील ऊस हिरडगाव (ता.श्रीगोदा ) येथील गौरी शुगर्स कडे गाळपासाठी पावला होता. त्याचे बील ८६ हजार रुपये मे 2024 मध्ये कारखान्याने पाठवले पण ती रक्कम श्री. नाळे यांना मिळाली नाही. याबाबत वारंवार पाठपुराव्यानंतर कारखान्याचे गटप्रमुख दत्तात्रय हिरडे यांनी माहिती घेतल्यावर समजले की, श्री. नाळे यांची रक्कम चुकीच्या खातेक्रमांकामुळे शारदा विठ्ठल गवळी रा.खंदकरोड, करमाळा यांच्या खात्यावर जमा झाली आहे. त्यानंतर श्री. हिरडे यांनी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड. डॉ.बाबूराव हिरडे यांच्याशी संपर्क साधून ही हकीकत सांगितली. त्यानंतर ॲड. हिरडे यांनी शारदा गवळी यांचे चिरंजीव वैभव गवळी यांच्याशी संपर्क साधून घडलेली हकीकत सांगून, तुमच्या आईच्या खात्यावर ८६ हजार रुपये आले का विचारले. त्यावेळी गवळी यांनी क्षणाचाही विलंब न लावता पैसे आले आहेत पण कोणाचे आहेत, हे माहीत नसल्याने आमच्याकडे आहेत व आम्ही द्यायला तयार आहोत. त्यानंतर श्री.नाळे यांना बोलावून घेऊन माजी नगरसेवक संजय सावंत व ॲड. हिरडे यांचे हस्ते शारदा गवळी व वैभव गवळी यांनी सर्व रक्कम नाळे यांच्याकडे सुपूर्द केली.

त्यानंतर श्री.नाळे यांनी श्रीमती गवळी नको म्हणत असताना श्री. सावंत यांच्या हस्ते पाच हजार रुपयाचे बक्षीस दिले. दत्तात्रय हिरडे यांनी गवळी परिवाराचे आभार मानले.

आज समाजात अनेक स्वार्थी लोक आहेत. बँकेत पैसे काढणार्याच्या अंगावर घाण टाकून पैसे लाटणारे लोक खूप आहेत. पण परिस्थिती नाजुक असूनही शारदा गवळी व वैभव गवळी यांनी सन्मानाने खात्यावर जमा झालेली रक्कम परत करून समाजात मोठा आदर्श निर्माण केला आहे.

संजय सावंत, माजी नगरसेवक , करमाळा नगर परिषद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!