विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शंभूराजे जगताप यांचा आजपासून गाव भेट दौरा सुरू

करमाळा (दि.१५) – येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगताप गटाचे युवानेते शंभूराजे जगताप यांचा आजपासून (दि.१५) गाव भेट दौरा सुरू झाला आहे. आज पोफळज, उमरड, सोगाव पूर्व, रिटेवाडी, मांजरगाव असा दौरा आयोजित केला गेला आहे.

करमाळ्याच्या राजकारणात जगताप गटाची भूमिका नेहमीच महत्वाची राहिली आहे. मागील विधानसभेला जगताप गटाने संजयमामा शिंदे यांना साथ दिली होती. यंदा मात्र जगताप गट वेगळी भूमिका घेणार असल्याचे दिसून येत आहे. आवाटी येथील कार्यक्रमात माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आपल्या भाषणातून वेगळी भूमिका घेण्याविषयीचे संकेत दिले होते. त्यामुळे जगताप गट काय भूमिका घेणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

त्यातच आजपासून शंभूराजे जगताप यांनी गाव भेट दौरा सुरू केल्याने जगताप गटाकडून उमेदवार उभा केला जाणार का ? याबाबत जनतेमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. सकाळी ९ नऊ वाजता पोफळज, १०:३० ला उमरड, दुपारी १२ ला सोगाव पूर्व,१:३० ला रिटेवाडी, ३ ला मांजरगाव असा दौऱ्याचा कार्यक्रम आहे. पुढील गाव भेट दौरा अजून प्रसिद्ध केला नाही.
या दौऱ्याविषयी अधिक माहिती देताना शंभूराजे जगताप म्हणाले की, “विकासाचे वचन करमाळकरांना .. विश्वास जूना जगताप गट पुन्हा” हे ब्रिद वाक्य हाती घेवून हा जनसंपर्क दौरा सुरु असून दररोज करमाळा-माढा मतदारसंघातील सर्व गावांना भेटी देवून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व विधान सभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ‘तालुका गावभेट दौऱ्याचे’ नियोजन केले आहे.





