केम येथे ५१ गाईंचे सामूहिक पूजन करत काढण्यात आली दिंडी

केम (संजय जाधव) – केम येथे वसुबारसचे औचित्य साधून गाईंचे पूजन व गो दिंडी सोहळ्याचे आयोजन केम ग्रामस्थ व गोरक्षकांकडून करण्यात आले. यामध्ये ५१ गाईंचे पूजन करण्यात आले.
राज्य शासनाकडून नुकतेच ३० सप्टेंबर रोजी देशी गाईंना राज्य मातेचा दर्जा देण्यात आला आहे. या गोष्टीचा आनंद व्यक्त करण्यासाठी व गोमाते विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन गोरक्षकांकडून करण्यात आले. वसुबारस या दिवशी हिंदू धर्मात गाय व वासराचे पूजन केले जाते. त्यामुळे याच दिवशी हा सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

सुरूवातीला शिवशंभो वेशीवरील राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाचे पूजन सरपंच सौ सारिका कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दिंडी सोहळयाला सुरूवात झाली या दिंडी सोहळयात ५१ गोमातेचा सहभाग होता. टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी श्री उत्तरेश्वर मंदिरात पोहचली. हा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. श्री उत्तरेश्वर देवस्थानचै महंत जयंतगिरी महाराज व पाच सुवासिनीच्या हस्ते गोमातेचे पुजन करुन सर्व गाईंना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली.
यावेळी केम येथील गोमाता मंदिराचे गोरक्षक परमेश्वर तळेकर म्हणाले की, शासनाने गाईला राज्य मातेचा दर्जा दिल्याचा आम्हा गोरक्षकांना आनंद झाला आहे. इतके वर्ष आम्ही गाई सांभाळल्याचे सोने झाले आहे. शासन ज्याप्रमाणे गोशाळेला अनुदान देते त्याप्रमाणे देशी गायांना अनुदान दिले तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी देशी गाय दिसेल व आपली शेती रसायनमुक्त होईल व सर्वांचे आरोग्य चांगले राहील. ‘देशी गाय वाचवा देश वाचवा’ असाही संदेश त्यांनी यावेळी दिला.
या दिंडी सोहळ्यासाठी कुंभार महाराज हनुमंत गिरी महाराज केम ग्रामस्थ व गोरक्षक यांनी परिश्रम घेतले.

गोमाता दिंडी सोहळा व गोमातेचे पूजनचा कार्यक्रम ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिरात साजरा करण्यात आला परंतु या कार्यक्रमासाठी श्री उत्तरेश्वर देवस्थान कमिटीचा एकच सदस्य उपस्थित असल्याने ग्रामस्थ व गोरक्षकांनी नाराजी व्यक्त केली.







