पोथरेकरांनी अनुभवली सुरेल गीतांची मैफिल, ऐतिहासिक दीपोत्सव सोहळा व खेळ पैठणीचा कार्यक्रम - Saptahik Sandesh

पोथरेकरांनी अनुभवली सुरेल गीतांची मैफिल, ऐतिहासिक दीपोत्सव सोहळा व खेळ पैठणीचा कार्यक्रम

करमाळा (सुरज हिरडे) : शनि देवाचे संपूर्ण मंदिर उजळून टाकणारा ऐतिहासिक २१२१ दिव्यांचा दीपोत्सव सोहळा, मंत्रमुग्ध करणारी सुरेल गीतांची मैफिल व त्यानंतर रंगलेला खेळ पैठणीचा हा मनोरंजनाचा कार्यक्रम दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पोथरेकरांना अनुभवायला मिळाला.

पोथरे ग्रामस्थांच्या वतीने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिवाळी पहाट आयोजित करण्याचे हे दुसरे वर्ष होते.

दीपोत्सव सोहळ्याची व्हिडीओ

तत्पूर्वी शनी मंदिरात ऐतिहासिक २१२१ दिवे लावून दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यामुळे संपूर्ण शनी मंदिर दिव्यांनी उजळून निघाले होते. यासाठी पोथरे येथील अनेक महिलांनी रात्री २ पासून मेहनत घेतली होती.

गीत सादर करताना कलाकार

त्यानंतर प्रसिद्ध गायक व वादकांच्या साथीने सुरेल गीतांचा कार्यक्रम पार पडला. पोथरे गावचे पोलीस पाटील व गायक संदीप पाटील यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी कलाकारांनी भावगीत, भक्तीगीत, चित्रपट गीतांची दर्जेदार गीते सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कलाकारांमध्ये गायन संदीप पाटील, रोहिणी पठारे, कृष्णा जाधव, संघमित्रा पाटील, आलोक पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे निवेदन रियाज पठाण यांनी केले. संगीत संयोजन अंबरीश जहागीरदार, पॅड व मशीन वादन गौतम गुजर, ढोलकी वादन अंकित करारे यांनी केले.
कार्यक्रमातील रसिक प्रेक्षकांनी या गीतांना भरभरून प्रतिसाद दिला व अनेकांनी कलाकारांना पैशाच्या रुपात बक्षिसेही दिले.

या कार्यक्रमानंतर महिलांसाठी खास खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये महिलांकडून जम्बलिंग करणारे वाक्ये म्हणणे, संगीत खुर्ची, नंबर ऐकून ग्रुप करणे आदी खेळ घेण्यात आले. या खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

स्पर्धेतील विजेते

या खेळातून प्रथम बक्षीस उषा विकास आढाव यांना, दुसरे बक्षीस राणी बाळासाहेब झिंजाडे यांना तर तिसरे बक्षिस उषा राजेंद्र झिंजाडे यांना मिळाले.

ग्रामीण भागामध्ये दिवाळी पहाट सारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात नेहमीच उदासीनता असते. त्यात विविध प्रोफेशनल गायक वादकांचा संच असलेला कार्यक्रम आयोजित करणे खूपच खर्चिक असते. केलाच आयोजित तर ऐकणारे रसिक किती असणार हा देखील आयोजकांना प्रश्न असतो. त्यामुळे ग्रामीण भागात असे कार्यक्रम शक्यतो आयोजित केले जात नाहीत. त्यामुळे काही रसिकांना इच्छा असून देखील असे कार्यक्रम अनुभवायला मिळत नाहीत. गायक संदीप पाटील यांनी पोथरे सारख्या ग्रामीण भागात असा प्रोफेशनल कार्यक्रम करण्याचे धाडस दाखविले  व ग्रामस्थांनीही यासाठी साथ दिल्याने मागील वर्षी व या वर्षी असा २ वेळेस हा कार्यक्रम यशस्वी पार पडला.

हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी हरिभाऊ झिंजाडे, मच्छिन्द्र झिंजाडे, ज्ञानदेव नायकोडे, संदीप पाटील,रामकृष्ण नायकोडे आदींनी परिश्रम घेतले.

यावेळी यशकल्यानी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, राख सर,माने सर, त्यात्या काळे पाटील,चेतन किंगर, संदीप चुंग,प्रकाश लावंड,प्रकाश पाटील,जयद्रथ शिंदे, सरपंच अंकुश शिंदे, विजय शिंदे, सोपानकाका शिंदे, अजिनाथ झिंजाडे, दादासाहेब झिंजाडे, प्रभाकर शिंदे, अंगद देवकते,सिद्धार्थ वाघमारे यासंह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!