संजय विठ्ठल शिंदे यांच्यासह १६ जणांची माघार – निवडणुकीच्या रिंगणात १५ जण
करमाळा (दि.४) : करमाळा विधानसभा मतदार संघात जोरदार घडामोडी झाल्या असून ३१ उमेदवारांपैकी १६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. विशेष म्हणजे संजय विठ्ठलराव शिंदे अपक्ष उमेदवार यांचेसह अतुल भैरवनाथ खुपसे, उदयसिंह निळकंठ देशमुख, डॉ.सुजितकुमार शिंदे आदी जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. असे असलेतरी या निवडणुकीत चौरंगी सामना होणार हे स्पष्ट झाले आहे.
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार डमी फॉर्म भरलेले यशवंत संजयमामा शिंदे तसेच माया रामदास झोळ यांचेसह बहुजन समाज पार्टीचे शहाजान पैगंबर शेख, रासपचे विकास शिवाजी आलदर यांनी तर अपक्ष उमेदवार सुहास शिवमुर्ती ओहोळ, बाळासाहेब मच्छिंद्र वळेकर, जरांगे समर्थक उदयसिंह निळकंठ देशमुख, दत्तात्रय शिंदे, पोपट निवृत्ती पाटील, संभाजी उबाळे, सागर लोकरे, जितेंद्र गायकवाड व संभाजी भोसले अशा १६ जणांनी वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात विद्यमान आमदार संजय मामा शिंदे, महाविकास आघाडीचे नारायण आबा पाटील, महायुतीचे दिग्विजय बागल, अपक्ष प्रा. रामदास झोळ यांचेसह बसपाचे संजय वामन शिंदे, न्यु राष्ट्रीय समाज पार्टीचे अशोक ज्ञानदेव वाघमोडे यांचेसह अपक्ष सिध्दांत वाघमारे, अॅड. जमीर शेख, जालिंदर कांबळे, धीरज कोळेकर, गणेश भानवसे, मधुकर मिसाळ, विनोद सितापुरे ( दाळवाले), अभिमन्यु अवचर आणि संजय लिंबराज शिंदे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले असून आमदार शिंदे यांना सफरचंद, रासपचे वाघमोडे यांना पिपाणी, संजय लिंबराज शिंदे यांना शिमला मिरची, महाविकास आघाडीचे उमेदवार पाटील यांना तुतारी वाजवणारा माणूस, महायुतीचे दिग्विजय बागल यांना धनुष्यबाण, अपक्ष प्रा. रामदास झोळ यांना ऑटो रिक्क्षा, अवचर यांना ग्रामफोन, शेख यांना शीट्टी, कांबळे यांना एअरकंडिशनर, कोळेकर यांना बॅट, भानवसे यांना कपाट, मिसाळ यांना खाट, वाघमारे यांना बेबी वॉकर, डाळवाले यांना बासरी, बसपाचे शिंदे यांना हत्ती अशी चिन्हे देण्यात आली आहेत. उद्यापासून प्रचाराचा धडाका सुरू होणार असून, कोण किती तडफेने प्रचार करतो याकडे तालुकावासियांचे लक्ष वेधले आहे.
अतुल खूपसे यांनी देखील घेतला अर्ज माघारी
अतुल खूपसे पाटील यांनी देखील उमेदवारीचा अर्ज माघारी घेतलेला आहे. सुरुवातीला त्यांना वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी जाहीर झाली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर विधानसभेसाठी अर्ज भरताना अतुल खूपसे पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. मागच्या पंचवार्षिक मध्ये देखील ते निवडणुकीला उभे होते त्यानंतर गेल्या पाच वर्षात त्यांनी सतत आंदोलने केली आहेत गावागावात विविध कामे करत कार्यकर्ते जोडण्याचे काम केले आहे त्यामुळे यंदा ते निवडणुकीत अर्ज माघारी घेतील अशी शक्यता नव्हती.