३७ वर्षांनंतर विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा भरली शाळा! - Saptahik Sandesh

३७ वर्षांनंतर विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा भरली शाळा!

करमाळा(सुरज हिरडे): नोकरी-व्यवसायात व संसारात एकदा माणसाचे आयुष्य व्यस्त झाले की प्रत्येकाला आपले शाळा कॉलेजातील आयुष्य छान होते असे वाटायला लागते. शाळेच्या दिवसांत  मित्र मैत्रिणींसोबत घालवलेले क्षण, वर्गातील घडलेले वेगवेगळे किस्से, विविध शिक्षकांनी केलेल्या शिक्षा, त्यांच्या बोलण्या वागण्याची पद्धत, वेगवेगळ्या मित्रांनी शाळेत केलेल्या खोड्या, भांडणे अशा सर्व गोष्टी सर्वांना आठवत असतात. एकत्र शिकलेल्या सर्वच मित्र-मैत्रिणींना एकत्र भेटण्याचा योग शाळा सुटल्यानंतर कधीच भेटत नाही. मोजक्याच मित्र मैत्रिणींची भेट होत असते. गेट टुगेदरच्या (स्नेहसंमेलनाच्या) माध्यमातून या शाळेतील आठवणींना उजाळा देण्यासाठी  करमाळ्यातील महात्मा गांधी विद्यालायातील १९८७ च्या दहावी अ बॅचच्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला व ३७ वर्षांनंतर पुन्हा एकदा शाळेचा अनुभव या विद्यार्थ्यांना घेतला.

शाळा म्हणजे एक आठवण मनाच्या गाभाऱ्यात साठवलेली! शाळा म्हणजे एक साठवण, मौजमजेची, आनंदाची, कधीही न विसरता येणारी!

करमाळा येथे ९ व १० नोव्हेंबर असे दोन दिवसीय गेट टुगेदर घेण्यात आले होते. सुमारे ३७  वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेमध्ये एकमेकांना भेटले. विशेष म्हणजे या मध्ये अनेकजण हे परगावाहून आले होते. यामध्ये अनेक महिला देखील होत्या. त्यांची राहण्याची विशेष सोय येथील स्थानिक असणाऱ्या त्यांच्या मित्रांनी केली होती. 

या गेट-टुगेदर च्या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी  महात्मा गांधी विद्यालयातील एका वर्गातील बेंच वर बसुन  सामुहिक प्रार्थना, राष्ट्रगीत म्हणाले. प्रत्येक विद्यार्थ्यांची ओळख, ते सध्या काय करतात, फॅमिली वगैरे माहिती सांगण्यात आली. हयात नसलेल्या गुरुजनांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.प्रत्येकाकडे असणाऱ्या  वेगवेगळ्या कला गुणांचे दर्शन करण्यात आले. यामध्ये गीत-गायन, कविता, अनुभव कथन, जोक, वेगवेगळे किस्से सर्वांमध्ये शेअर करत जुन्या आठवणींना देखील उजाळा देण्यात आला. याचबरोबर  मजेदार खेळ, अंताक्षरी घेण्यात आली. त्यातून जिंकणाऱ्यांना बक्षीस वाटप आदी कार्यक्रम घेतले. याचबरोबर सर्वांनी कमलाभवानी देवीमंदिर परिसर,सात विहीर आदी ठिकाणी भेट दिली. एकत्र भोजन केले.  अशा प्रकारे विविध उपक्रम राबवून हे स्नेह संमेलन सर्वांना एक गोड आठवण देऊन गेले.

विद्यार्थ्यांमध्ये डॉ. प्रमोद कांबळे, डॉ. मनोज काळे, संदेश उबाळे, भीष्माचार्य चांदणे, किरण भुसारे, अजिनाथ घाडगे, आण्णासाहेब पाटील,शशिकांत देवकर,दगडू वाडेकर, प्रवीण जगताप,नितीन विधाते,शरद कोकीळ, जोतिराम कोकाटे, नागेश कांबळे, संतोष सुंदेचामुथा, डॅा सिध्दार्थ गायकवाड आदीजन उपस्थित होते.

तर विद्यार्थिनींमध्ये अश्विनी दोशी,वंदना निलाखे,वैशाली शहा, गीता देवी, वंदना घोलप, वैशाली महाजन, अंजु किंगर, वंदना पवार,  जयश्री माळवे, निर्मला शेंडे आदीजन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!