बॅलेट पेपर नसेल तर मतदानावर बहिष्कार घालणार – तहसीलदारांना पत्राद्वारे दिला ईशारा
करमाळा (दि.९) – माझ्यासह अनेक लोकांचा ईव्हीएमवर अजिबात विश्वास राहिलेला नसून येथून पुढच्या काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर केला तरच मी मतदान करणार आहे. अन्यथा माझा मतदानावर बहिष्कार राहील अशा प्रकारचा ईशारा करमाळा येथील महात्मा फुले समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी करमाळा तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्राद्वारे दिला आहे.
झिंजाडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नोव्हेंबर, २०२४ मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या झालेल्या निवडणुकांचा ईव्हीएम मशीनद्वारे लागलेला निकाल हा संशयास्पद आहे. यामध्ये निश्चितच गडबड असून चुकीचे प्रतिनिधी सत्तेवर निवडून आलेले आहेत. ते लोकशाहीच्या मार्गाने सत्तेवर निवडून आले नसून ईव्हीएम मशीन मध्ये हेराफेरी करून गैरमार्गाने म्हणजेच हुकूमशाही पध्दतीने सत्तेवर आलेत आहेत. भारताचा विचार करता हा भारतातील अंदाजे १४० कोटी लोकसंख्येचा विश्वासघात असून या वर वेळीच निर्णय न घेतल्यास भारतात याचा उद्रेक होऊ शकतो. म्हणजेच भारतातील १४० कोटी लोकांच्यात शांततेचा भंग झाला आहे. लोकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ते दूर करण्यासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वर मतदान करणे आवश्यक आहे. माझ्या प्रमाणे अनेकजण ईव्हीएम च्या विरोधात आहेत. मारकडवाडी ता माळशिरस जिल्हा सोलापूर हे उत्तम उदाहरण आहे.
अनेक लोकांचा ईव्हीएमवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. येथून पुढच्या काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर केला तरच मी मतदान करणार आहे. अन्यथा माझा मतदानावर बहिष्कार राहील या संदर्भामध्ये आपण हे पत्र मिळाल्यापासून मला तीन महिन्यापर्यंत आपला निर्णय कळवावा अशी अपेक्षा आहे. माझा हा निर्णय आपल्या मार्फत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, मुंबई व केंद्रीय निवडणूक आयोग, भारत सरकार दिल्ली यांच्यापर्यंत देखील पोहचवावा असे देखील त्यांनी पत्रात नमूद केले आहे.