निमगाव (ह) चे सरपंच लखन जगताप यांचे सरपंचपद जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द - Saptahik Sandesh

निमगाव (ह) चे सरपंच लखन जगताप यांचे सरपंचपद जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द

करमाळा (दि.१२) : करमाळा तालुक्यातील निमगाव (ह) चे सरपंच लखन जगताप यांचे सरपंचपद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्दबातल ठरवले आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

निमगाव हवेली येथील  मकाई सह साखर कारखान्याचे संचालक सतीश नीळ यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे  जगताप यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्याची लेखी तक्रार केली होती तसेच श्री जगताप यांना पदावरून बडतर्फ करावे अशी देखील मागणी त्यांनी केली होती.

नीळ यांच्या तक्रारीनंतर ग्रामसेवक व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी गावातील पंचांच्या उपस्थितीत या अतिक्रमीत जागेची पाहणी करुन अहवाल सादर केला. या अहवालावरून अतिक्रमण केल्याचे समोर आले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच लखन जगताप यांना पुरावे देण्याबाबत व म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली. मात्र त्यांना पुरावे देता आले नाहीत त्यामुळे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (ज-3) व 16 प्रमाणे उत्तरवादीनां ग्रामपंचायत सरपंच व सदस्य राहण्यास अपात्र ठरवुन त्यांची निवड रद्द केली. १० डिसेंबर २०२४ रोजी हा निर्णय दिला. सतीश नीळ यांच्या वतीने अ‍ॅड. घोडके तर जगताप यांच्या वतीने अ‍ॅड.मराठे यांनी बाजू मांडली.

मकाई सह साखर कारखान्याचे संचालक सतीश नीळ यांची पार्टी बहुमताने विजयी झालेली होती परंतु लखन जगताप यांनी बागल गट सोडून सरपंच पद मिळविले होते. या कारणामुळे सतीश नीळ यांनी लखन अरुण जगताप यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्याची लेखी तक्रार सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!