महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी श्री.काकडे यांची निवड

केम (संजय जाधव): महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी ज्ञानदेव उर्फ दीपक काकडे यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रदेश कार्यालय इंदापूर या ठिकाणी दिनांक २२ डिसेंबर रोजी कार्यकर्ता मेळावा, जाहीर पक्षप्रवेश व नूतन पदाधिकारी निवडी असा कार्यक्रम पक्षप्रमुख संजय सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी श्री. काकडे यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर नूतन पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या. करमाळा तालुक्यातून ही मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांचा परिचय करून घेतल्यानंतर पक्षप्रमुख संजय सोनवणे यांनी ज्ञानदेव उर्फ दीपक काकडे यांची करमाळा तालुका अध्यक्षपदी निवड केली. तालुका अध्यक्षपदी निवडीचे पत्र देऊन काकडे यांना पक्ष वाढीसाठी च्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीनंतर करमाळा तालुक्यातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
श्री. काकडे हे करमाळा तालुक्यात गेल्या २० वर्षापासून आंबेडकरी चळवळीत काम करत असून त्यांनी विविध पदांवर काम केलेले आहे. सध्या ते उपविभागीय दक्षता नियंत्रण समिती माढा उपविभागाचे अशासकीय सदस्य म्हणून काम करीत आहेत त्याचप्रमाणे परिवर्तन न्यूज लाईव्ह या चॅनेलचे मुख्य संपादक म्हणूनही ते काम पाहत आहेत.




