रावगाव जवळ एसटी पलटी होऊन झाला अपघात – जखमींवर उपचार सुरू
करमाळा (दि.३१) : रावगावजवळ एसटी बस पलटी होऊन अपघात घडला आहे. झालेल्या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून जखमींना तातडीने करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
समजलेल्या माहितीनुसार, करमाळा आगाराची एसटी बस (क्रमांक MH13 CU 7883) कर्जतहुन करमाळाकडे येत असताना रावगाव जवळील बुधवंत वस्तीजवळ आल्यावर स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने चालकाला गाडी कंट्रोल करता आली नाही व एसटी पलटी होऊन हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी रायगाव येथील ग्रामस्थ वेळेत पोहोचल्याने त्या ठिकाणी एसटीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. तसेच वेळेत ॲम्बुलन्स बोलावून जखमींना करमाळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. 30 ते 35 प्रवासी गाडीत असल्याची माहिती मिळाली असून त्यापैकी 23 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर त्यातील बहुतेक जणांना मुक्कामार लागला आहे. ३-४ जणांना हातापायाला जोराचा मार लागला आहे. यावेळी घटनास्थळी रायगाव व परिसरातील ग्रामस्थांचे वेळीच मदत केली. त्यांनी बसच्या समोरील काच फोडून आत प्रवेश केला व प्रवाशांना बाहेर काढले. करमाळा पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केलेला आहे.
एसटीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
एसटी प्रवासासाठी आगारातून बाहेर काढल्यापासूनच एसटीची स्टेअरिंग हलत असल्याचे ड्रायव्हर कडून सांगण्यात आले व अपघाता वेळी एसटीचा रोड तुटल्यामुळे ड्रायव्हरला गाडी कंट्रोल करता आली नसल्याची माहिती समोर आली आहे. करमाळा एसटी आगारातील बसेस सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे विविध मार्गावर बंद पडत असून बस च्या विविध कारणांमुळे प्रवाशांना बस ने प्रवास करणे आता नकोसे वाटायला लागले आहे. अशात स्टिरिंगच्या प्रॉब्लेम मुळे हा अपघात झाल्यामुळे एसटीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
रावगावजवळ एसटीचा अपघात झाल्याचे स्थानिकांनी मला फोन करून सांगितले व ॲम्बुलन्स मागवली. तेव्हा दोन ॲम्बुलन्सद्वारा जखमींना तातडीने करमाळ्यातील कुटीर रुग्णालयात आणून दाखल केले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. २३ जणांचे केसपेपर काढले. बहुतेक जणांना मुक्का मार लागलेला आहे. ३-४ जणांना हातापायाला जोराचा मार लागला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
● साजिद शेख, माजी सैनिक ॲम्बुलन्स सर्व्हिस करमाळा