राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आय टी आय कॉलेज मध्ये उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा(दि.१२) : करमाळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१२ जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन म्हणून संपूर्ण राष्ट्रामध्ये साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने युवकांच्या विविध गुणांना तसेच कौशल्यांना वाव व प्रोत्साहन मिळावे, यासाठी करमाळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता युवकांसाठी उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र राठी, तहसीलदार शिल्पा ठोकडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे,महावितरण सहाय्यक अभियंता रघुनाथ शिंदे यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ सोलापूरचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर हे या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीत जास्त युवकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य अवधूत जाधवर यांनी केले.




