घोटी मध्ये उत्तरेश्वर कॉलेजचे श्रम – संस्कार शिबिर सुरू

केम(संजय जाधव): श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केमचे घोटी येथे राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन संपन्न झाले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन घोटी या ठिकाणी करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सोलापूर जिल्हा राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सुरुवातीला श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच जि प मराठी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल घोटी येथील विद्यार्थ्यांनी गावातून जनजागरण रॅली काढली. या रॅलीमध्ये मुलगी वाचवा देश वाचवा, झाडे लावा झाडे जगवा अशा विविध घोषणा देण्यात आल्या. यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत करावयाच्या कामासाठी आवश्यक साहित्याची पूजा यावेळी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. लक्ष्मण राख यांनी राष्ट्रीय सेवा योजना आणि त्यातून होणारा ग्रामीण भागातील विकास सांगितला. आजच्या काळात राष्ट्रीय सेवा योजनेचे असणारे महत्त्व आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी समाजसेवा याविषयी त्यानी आपले मत मांडले. यावेळी त्यांनी गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा या भजनाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. यावेळी या शिबिरासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे घोटी गावचे सरपंच श्री विलासकाका राऊत यांनी श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजच्या या उपक्रमाचे कौतुक केले. घोटी ग्रामस्थांच्या वतीने या शिबिरासाठी संपूर्ण सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात अशा श्रमसंस्कार शिबिराची खूप गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली. त्यांनी कॉलेजच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे यांनी, सूत्रसंचालन श्री वैजिनाथ दोलतडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.संतोष साळुंखे यांनी केले.
या कार्यक्रमास जि.प.मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलाकर सांगळे, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मण मोरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रमोदकुमार म्हेत्रे, उपाध्यक्ष श्री नवनाथ राऊत, ग्रामविकास अधिकारी श्री इंगळे भाऊसाहेब, श्री प्रशांत शेंडे, श्री हिराजी राऊत, श्री भारत जाधव, श्री सचिन रणशृंगारे, श्री धनाजी ताकमोगे, श्री लक्ष्मण गुरव,पर्यवेक्षक श्री सुनील गीते सर, श्री सागर महानवर, प्रा. संतोष रणदिवे, प्रा. एस. के. पाटील, प्रा. सतीश बनसोडे हे उपस्थित होते. यावेळी मराठी शाळेचे सर्व शिक्षक वृंद व न्यू इंग्लिश स्कूल घोटी प्रशालेचे सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व घोटी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




