कोयत्याचा धाक दाखवत दरोडा टाकण्याचा प्रयत्न – हल्ल्यात २ महिला जखमी
करमाळा(दि.३): दि.३० जानेवारीला मध्यरात्री २ ते २:३० च्या दरम्यान, ४ ते ५ दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत हॉलमध्ये झोपलेल्या महिलांना कोयत्याचा धाक दाखवून तिजोरीच्या चाव्यांची मागणी केली. त्यांनी चाव्या देण्यास नकार दिल्याने दरोडेखोरांनी कोयत्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेत २ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
कंदर (ता.करमाळा) येथील येथील प्रसिद्ध केळी व्यावसायिक किरण डोके यांच्या घरी हा सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. या हल्ल्यात ज्योती कल्याण डोके व श्रद्धा कल्याण डोके या मायलेकी गंभीर जखमी झाल्या. घरातील लोकांनी आरडाओरडा केल्याने शेजारील लोक जागे झाले. हे पाहून दरोडेखोर तेथून पसार झाले आणि फार मोठा घातपात टळला. जखमी मायलेकींवर अकलूज येथे उपचार सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेचा कसून तपास करून दरोडेखोरांना लवकरात लवकर पकडावे अशी मागणी कंदर परिसरातील नागरिकांनी केली आहे.