केम येथील प्राची तळेकर व मयुरी दोंड या युवतींची मुंबई पोलीस दलात निवड

केम(संजय जाधव): केम येथील प्राची राजेंद्र तळेकर व मयुरी सुरेश दोंड या दोन युवतींची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या दोघींनी पोलिस दलात भरती व्हायचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. या यशामुळे त्यांच्यावर ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मयुरी हिने बीसीएचे शिक्षण घेतले असून प्राचीचे बी. कॉमचे शिक्षण सुरू आहे. दोघींनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षीच पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे. निवडीनंतर शिवसेना महिला आघाडिच्या वतीने या दोघींचा सन्मान करण्यात आला. यावेळी शाल, फुलांचा हार, श्रीफळ देत दोघींचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना या युवतींनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व मार्गदर्शक शिक्षकांना दिले. तसेच त्यांचा सन्मान केल्याबद्दल शिवसेना महिला आघाडीचे आभार मानले.

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख वर्षा चव्हाण यांनी या दोघींच्या निवडीचे कौतुक करत दोन्ही युवतींचा आदर्श इतर मुलींनीही घेत आपले करिअर घडवावे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमास मनिषा माने,सीमा वाघमोडे, शोभा शिंदे रोहिणी चौगुले नंदिनी माने, राजेंद्र तळेकर सुरेश दोंड, सुनिल चव्हाण पाटिल आदि उपस्थित होते.






