प्राचार्य रा.रं बोराडे यांच्या जाण्याने मराठी ग्रामीण साहित्यातील एक दीपस्तंभ कोसळला : प्रा.डॉ.संजय चौधरी

करमाळा / संदेश प्रतिनिधी : ‘पाचोळाकार’ प्राचार्य रा.रं बोराडे म्हणजे अनेक नवे लेखक तयार करणारी कार्यशाळा होते.लेखकांनी कसे लिहावे हे बहुदा मोठा लेखक सांगत नाही परंतु बोराडे सरांनी दरवर्षी अनेक नवे लेखक एकत्र करून त्यांच्यासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या त्यातून काही नवे लेखक निर्माण झाले.कादंबरीकार म्हणून प्राचार्य बोराडे सरांचे महत्त्व आहेच पण ग्रामीण साहित्याची चळवळ पुढे जावी यासाठी त्यांनी मनापासून केलेले प्रयत्न फलद्रूप झालेले आहेत. ग्रामीण जीवनावर व ग्रामीण साहित्यावर असे प्रेम करणारा मोठा माणूस पुन्हा होणे नाही असे प्रतिपादन भारत महाविद्यालयाचे प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी केले.
भारत महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ.अनंत शिंगाडे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या रा.रं बोराडे यांच्या श्रद्धांजली सभेमध्ये डॉ.चौधरी बोलत होते.आपल्या भाषणात पुढे बोलताना प्राध्यापक चौधरी म्हणाले की,’पाचोळा’ या त्यांच्या कादंबरीमुळे अनेक ग्रामीण कथा कादंबरीकार मराठी साहित्यात निर्माण झाले कौटुंबिक दुःख किती कलात्मकतेने मांडता येते हे बोराडे सरांनी त्यांच्या कथा कादंबऱ्यांमध्ये दाखवून दिले. ज्यांचे कुणी नाही अशा कष्टकरी माणसांच्या जगण्यातील व्यर्थता बोराडे यांनी खूप संवेदनशीलतेने आपल्या साहित्यात मांडली. नात्यानात्यामधील संबंध, गरीबी आणि श्रीमंतीमुळे एकमेकांपासून दूर जाण्याचे प्रसंग, मिळवता नवरा व्यसनाधीन झाल्यामुळे घरातील स्त्रियांची होणारी कुचुंबना असे नानाविध विषय बोराडे सरांनी आपल्या कथा कादंबऱ्यात हाताळले.