फिल्मीगीत गायन शिकणाऱ्यांसाठी प्रसिद्ध गायक प्रवीणकुमार अवचर देणार गायनाचे धडे

करमाळा(दि.१५): करमाळा तालुक्यातील उदयोन्मुख गायकांना तसेच फिल्मी गीत गायनाचा छंद असणाऱ्यांना गाणे शिकण्यासाठी सुवर्णसंधी मिळणार आहे. पुणे,मुंबईसह, देश विदेशात मोठंमोठ्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाणारे प्रसिद्ध गायक व करमाळा तालुक्याचे सुपुत्र प्रवीणकुमार अवचर हे येत्या १ मार्चपासून करमाळा शहरामध्ये फिल्मी गीत गायनाचे धडे देणार आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना प्रवीण कुमार अवचर म्हणाले की, “कलाकार घडवूया” या संकल्पनेतून पुणे येथील प्रचंड यशानंतर माझे मूळ गाव म्हणजेच करमाळा या ठिकाणी कलाकार घडवण्याचे काम मी माझ्या ‘संगीत रंग’ या म्युझिक अकॅडमी मधून काम सुरू करणार आहे. यामध्ये उदयोन्मुख गायकांना तसेच फिल्मी गीत गाण्याचा छंद असणाऱ्यांना व्यक्तींना वयाच्या कोणत्याही अटीविना नाममात्र दरात शिकवणार आहोत. यामध्ये गायनाचे मूलभूत ज्ञानासोबत कॅराओकेवरती चित्रपट गीतांच्या गाण्याचे ज्ञान दिले जाणार आहे. माझ्या संगीत क्षेत्रातील अनुभवाचा फायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
संगीत शिकण्याचे महत्त्व सांगताना श्री. अवचर म्हणाले की,परदेशामध्ये बाग बगीचा मध्ये झाडांच्या वाढीसाठी सकाळ संध्याकाळ संगीत ऐकवले जाते. ज्याप्रमाणे संगीताचा झाडांच्या वाढीवरती पॉझिटिव्ह परिणाम होतो त्याचप्रमाणे मानवी शरीरावरती संगीत ऐकल्याने गायन केल्याने आपल्या शरीरावरतीही तसाच परिणाम होतो.
सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्यामुळे आपल्या मनावरील ताण,नकारात्मक विचार, दैनंदिन जीवनातील टेन्शन या सर्व गोष्टी दुर होतात. यालाच वैद्यकीय भाषेत आपण म्युझिक थेरपी असे म्हणतो. अनेक स्त्री, पुरुषांना वयाच्या चाळीशी नंतर विविध प्रकारचे टेन्शनस, वाढत्या जबाबदाऱ्या यामुळे शरीरावरती होणारे दुष्परिणाम हे संगीत ऐकल्यामुळे, गायनामुळे सकारात्मक ऊर्जा मिळून, टेन्शन पासून मुक्ती मिळते. त्यामुळे संगीतासाठी प्रत्येकाने वेळ द्यायला हवा.






