होळी व इतर सणानिमित्त दौंड-कलबुर्गी विशेष अनारक्षित ट्रेन – पारेवाडी, जेऊर, केम स्टेशन वर थांबा

केम (संजय जाधव) – येत्या होळी व ईतर सणानिमित्त ९ मार्च ते २० मार्च २०२५ दरम्यान दौंड ते कलबुर्गी या दोन स्टेशन दरम्यान रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गाडी क्र. 01425 ही गाडी दौंड वरून कलबुर्गीकडे आठवड्यातून गुरुवार आणि रविवार अशी दोन दिवस चालणार आहे. तर गाडी क्र. 01426 ही गाडी कलबुर्गी येथून दौंडकडे आठवड्यातून शुक्रवारी आणि सोमवारी अशी दोन दिवस चालणार आहे. ९ मार्च पासून या दोन्ही रेल्वे गाड्या सुरू होणार आहेत. या गाड्यांना भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डुवाडी या स्टेशनवर थांबा असल्याने करमाळा तालुका व परिसरातील लोकांना या गाडीचा फायदा होणार आहे. हीच गाडी मागील दिवाळी सणानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरती सुरू केली होती. आता होळीनिमित्त पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

गाडी क्र. 01425/01426 दौंड – कलबुर्गी – दौंड अनारक्षित विशेष
गाडी क्र. 01425 दौंड – कलबुर्गी अनारक्षित विशेष गाडी दि. ९ मार्च २०२५ ते २२ मार्च २०२५ पर्यंत आठवड्यातून दोन दिवस (गुरुवार आणि रविवार) दौंड रेल्वे स्थानक येथून सकाळी 05.00 वाजता सुटेल तर सोलापूर रेल्वे स्थानकावर 08.40 वाजता येणार आणि 11.20 वाजता कलबुर्गी स्थानक येथे पोहोचेल. जेऊर स्थानकावर ही गाडी 6:24 ला तर केम स्थानकावर 6:44 ला पोहोचेल.
गाडी क्र. 01426 कलबुर्गी -दौंड अनारक्षित विशेष गाडी दि. ९ मार्च २०२५ ते २० मार्च २०२५ पर्यंत आठवड्यातून दोन दिवस (गुरुवार आणि रविवार) कलबुर्गी रेल्वे स्थानक येथून संध्याकाळी 08.30 वाजता सुटेल तर सोलापूर रेल्वे स्थानकावर रात्री 10.55 वाजता येणार आणि मध्यरात्री 02.30 वाजता दौंड स्थानक येथे पोहोचेल. केम स्थानकावर ही गाडी मध्यरात्री 0:45: ला तर जेऊर स्थानकावर मध्यरात्री 1:02 ला पोहोचेल.
थांबे: दौंड, भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अक्कलकोट रोड, बोरोती, दुधनी, गाणगापूर आणि कलबुर्गी असे असतील.
संरचना: 10 अनारक्षित 2 गार्ड्स ब्रेक व्हॅन. एकूण 12 कोच असतील.

परत एकदा ही रेल्वे सेवा होळी सणासाठी प्रायोगिक तत्वावर चालवल्या जात आहे. ही सेवा नियमित सुरू होणेबाबत प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे ( दिल्ली) मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहे. ती सेवा कायमस्वरूपी होण्यासाठी प्रयत्नशील राहू व कायमस्वरूपी होईल अशी आशा आहे.
● श्री. संजय पाटील (सोलापूर जिल्हा प्रवासी संघ)
या रेल्वे सेवेमुळे दौंड, भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ या परिसरातील नागरिकांना सकाळच्या वेळी सोलापूर आणि पुढे जाऊन अक्कलकोट, गाणगापूरकडे सुद्धा प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर सायंकाळच्या वेळी परतीचा प्रवास करता येता येईल. त्यामुळे मासिक पासधारक, विद्यार्थी, कर्मचारी,छोटे मोठे दुकानदार, व्यावसायिक, भक्त गण, कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद मध्ये कामानिमित्त जाणारे नागरिक, सोलापूर मधील रुग्णालय मध्ये जाणारे रुग्ण – त्यांचे नातेवाईक या सर्वांची सोय होणार आहे. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार माहिती http://www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES ॲप वर मिळेल.


