किल्ला विभागातील मारुती मंदिर परिसरात काँक्रिटीकरण करावे – नगरपालिकेला निवेदन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा नगर परिषदेने शासनाच्या अनुदानातून मंजूर झालेले किल्ला विभाग येथील मारुती मंदिर परिसरात काँक्रीटकरण करणे गरजेचे असताना हे काम अद्याप गेल्या सहा महिनेपासून झालेले नसल्याने हे काम येत्या आठ दिवसात सुरू न झाल्यास १७ मार्च २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता करमाळा नगरपरिषद कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे लेखी निवेदनाद्वारे करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्यावतीने कार्यालय अधिक्षक कविटकर यांच्याकडे दिले आहे.

सदर निवेदन देताना याप्रसंगी फारुक जमादार व करमाळा नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता आकाश वाघमारे उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत सन 2023 – 24 या आर्थिक वर्षांमध्ये किल्ला विभाग येथील मारुती मंदिर परिसरात काँक्रिटीकरण करणे हे काम मंजूर झाले होते, सदरचे कामाची निविदा दिनांक 14 जुलै २०२४ रोजी जाहीर निविदा चे प्रसिध्दीकरण झाले असून, अद्याप ठेकेदारानी कोणतेही काम केलेले दिसून येत नाही, सदर ठेकेदाराची ६ फेब्रुवारी २०२५ अखेर कामाची मुदत संपलेली असून, अद्याप पर्यंत ठेकेदाराला कामासंदर्भात नगरपालिकेने साधी नोटीस दिली नाही, पालिका चे अभियंता चे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे तसेच नगरपरिषदेने येत्या आठ दिवसात काम सुरू न केल्यास करमाळा नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात जमादार यांनी म्हटले आहे, निवेदनाच्या प्रती मा, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, मा, जिल्हाधिकारी सोलापूर मा, जिल्हा पोलिस प्रमुख ग्रामीण सोलापूर, तहसीलदार करमाळा पोलीस निरीक्षक करमाळा यांना दिले आहे.





