रेश्मा मिरगणे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान - Saptahik Sandesh

रेश्मा मिरगणे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

करमाळा(दि.२): राष्ट्रमाता जिजाऊ नगरपालिका शाळा क्रं 3 कुर्डूवाडी येथे कार्यरत असणाऱ्या शिक्षिका सौ रेश्मा प्रसाद मिरगणे यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती उपशाखा माढा तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, गुणवत्ता वाढीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सौ.मिरगणे यांनी प्रयत्न केले आहेत. अनेक अशैक्षणिक कामाचा भडीमार असतानाही त्यांची विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, तसेच कोरोना काळात ऑनलाईन अध्यापनात महत्वाचे योगदान, त्यानंतरच्या काळात एटीएस मंथन आयटीस सारख्या स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत, माढा पंचायत समिती च्या 2018 च्या उपक्रमशील शिक्षकांच्या यादीत नाव,दप्तराविना शाळा उपक्रमांतर्गत शाळेत विद्यार्थी हिताचे विविध शालेय व सहशालेय उपक्रमांचे आयोजन, समाजात आयोजित उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभागामुळे 2024 मध्ये नवरात्र महोत्सव मंडळातर्फे विशेष सन्मानचिन्ह अशा अनेक उल्लेखनीय बाबी पाहून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

उत्कृष्ट शैक्षणिक कार्य व विविध सामाजिक कार्यामध्ये असलेला उत्स्फूर्त सहभाग या कार्याचा सन्मान म्हणून शनिवार दिनांक 1 मार्च 2025 रोजी- जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, अरण येथे संपन्न झालेल्या माढा तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या भव्य त्रैवार्षिक अधिवेशनात माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित आबा पाटील यांच्या हस्ते सौ मिरगणे रेश्मा प्रसाद यांना गुणवंत शिक्षक हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास माजी आमदार विनायकराव पाटील,राज्य अध्यक्ष राजन पाटील,माजी सभापती शिवाजी कांबळे,विक्रमसिंह शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!