'आदिनाथ' ची निवडणूक बिनविरोध होवून पवार-मोहिते यांना सर्वाधिकार द्यावेत : माजी आमदार जयवंतराव जगताप - Saptahik Sandesh

‘आदिनाथ’ ची निवडणूक बिनविरोध होवून पवार-मोहिते यांना सर्वाधिकार द्यावेत : माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा / संदेश प्रतिनिधी : आदिनाथ सहकारी साखर कारखाना करमाळा तालुक्यातील सहकाराचे मंदिर असून हे मंदिर वाचविण्यासाठी आदिनाथ ची निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे आहे,तालुक्यातील जगताप गटासह सर्वच गट उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्व मानणारे आहेत. तेव्हा संचालक मंडळाचे निवडीचे सर्वाधिकार या तिघांना देण्यात यावेत. तरच कारखाना सुरळीत चालेल असे प्रतिपादनआदिनाथचे माजी चेअरमन तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले आहे.

आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जगताप यांनी सांगितले की,यापूर्वी निवडून दिलेले संचालक मंडळ हे कारखाना सक्षमपणे चालवण्यास अपयशी ठरलेले आहे. मकाईची देखील निवडणूक झाली पण कारखाना सुरू झाला का?यामुळेच मी यापूर्वी जाहीर व स्पष्टपणे आदिनाथ कारखाना बारामती ॲग्रो ला चालवायला द्या अन्यथा ब्रह्मदेव आला तरी आदिनाथ चालू होणार नाही असे सांगितले होते.

आदिनाथ साखर कारखान्याच्या दुरावस्थेबद्दल बोलताना जगताप म्हणाले की ,आदिनाथ लच्या स्थापनेपासून ज्यांनी सर्वाधिक सत्ता कारखान्यावर भोगली त्यांनी आदिनाथच्या नुकसानाची जबाबदारी घ्यावी. आदिनाथ बंद असताना देखील व कारखान्यावर प्रशासकीय कारभार चालू असताना देखील कशा पद्धतीने भ्रष्टाचार झालेला आहे हे आपण वृत्तपत्रातून वाचत आहातच. परंतु या सर्व सत्तेच्या साठमारी मध्ये आदिनाथचा खरा मालक असलेला सभासद मात्र प्रचंड दुर्लक्षित झाला असून, सभासदांच्या थंड, सोशिक व मरणासन्न भूमिकेमुळे त्यांच्यावर ही वेळ आल्याचे देखील जगताप यांनी स्पष्टपणे सांगितले.

आदिनाथ कारखान्याच्या सभासदांनी आतापर्यंत कारखान्यावर कोणी – कोणी कसा – कसा कारभार केला या सर्व सत्ताधाऱ्यांच्या, गटांच्या व सर्व चेअरमन यांच्या कारभाराचे डोळसपणे तुलनात्मक दृष्ट्या अवलोकन करून विचार करावा व आदिनाथच्या भवितव्या बाबत निर्णय घ्यावा. मी आदिनाथ कारखान्याचा चेअरमन असताना कशा पद्धतीने कारखाना चालवला जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांपेक्षा दिलेल्या शब्दा प्रमाणे ऊस उत्पादकांना एक रुपया ज्यादा दर दिला, त्याचबरोबर आपल्या काळात राबवलेल्या टेंडर प्रक्रिया,अनावश्यक खर्चाला दिलेला फाटा याचा संपूर्ण करमाळा तालुका साक्षीदार आहे.

करमाळा तालुक्याच्या आसपास प्रचंड गाळप क्षमता असलेले साखर कारखाने, त्यांचे सुयोग्य नियोजन,आर्थिक सक्षमता, योग्य दर या सर्व स्पर्धेत आपला टिकाव लागणार का? कारखान्यावर असलेला कर्जाचा बोजा, कामगारांचे थकलेले पगार, वाहन मालक व ऊस उत्पादकांची देणी, आगामी काळात कारखाना सुरू करण्यासाठी बँकांकडून कर्ज उपलब्ध होईल का?त्याची योग्य वेळेत परतफेड होईल का?कारखाना पूर्ण क्षमतेने चालवुन ऊस उत्पादकांना आसपासच्या खाजगी व सहकारी साखर कारखान्यांमध्ये प्रमाणे दर देणे शक्य होईल का?याचाही विचार करणे गरजेचे आहे.

करमाळा तालुक्याचे तिन्ही बाजूंनी पाण्याची असलेली उपलब्धता ,उसाचे क्षेत्र असताना देखील केवळ गैरव्यवस्थापनामुळे व अमाप पद्धतीने केलेल्या भ्रष्टाचारामुळे आदिनाथ कारखाना बंद पडला आहे याचा सभासदांनी आता तरी गांभीर्याने विचार करावा अन्यथा कारखान्याच्या ठिकाणी आपल्याला फक्त गंजलेल्या लोखंडाचा सांगाडा दिसेल कारखाना अस्तित्वात राहणार नाही हे कटू सत्य स्वीकारावे लागेल असे देखील माजी आमदार जगताप यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!