सरपडोहमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी -

सरपडोहमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी

0
घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते.

केम(संजय जाधव):  करमाळा तालुक्यातील सरपडोह गावात शनिवार दि. ५ एप्रिल रोजी भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सेवानिवृत्त आर्मी मेजर बाबुराव रंदवे (वय ७३) हे आपल्या पत्नी महानंदा यांच्यासह सरपडोह येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा नातू आजारी असल्याने ते दुपारी ११.३० वाजता अकलूज येथील रुग्णालयात गेले होते. घराला कुलूप लावून व गेट बंद करून ते दोघे अकलूजला गेले.

सायंकाळी ८.१० वाजता घरी परत आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की घराच्या कंपाऊंडचा गेट उघडा आहे. घराचा दरवाजा तोडलेला दिसला. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. पेटीतील कागदपत्रे बाहेर फेकलेली होती. तपासणी केली असता सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २,७०,००० रुपयांचा ऐवज चोरीला गेला असल्याचे उघड झाले.

चोरी गेलेला ऐवज —

  • रोख रक्कम — ३०,००० रुपये
  • सोन्याची साखळी (३ तोळे) — १,२०,००० रुपये
  • मणी गंठन (अर्धा तोळा) — ३०,००० रुपये
  • कांडया गंठन (अर्धा तोळा) — ३०,००० रुपये
  • सोन्याचे लुज मणी (अर्धा तोळा) — ३०,००० रुपये
  • कानातील वेल (अर्धा तोळा) — ३०,००० रुपये
  • एकूण अंदाजित किंमत — २,७०,००० रुपये

या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!