प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू; ७ महिन्यानंतर डॉक्टरांवर गुन्हा दाखल - Saptahik Sandesh

प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू; ७ महिन्यानंतर डॉक्टरांवर गुन्हा दाखल

स्व.शितल करगळ

करमाळा (दि.२५) – करमाळा येथील विठ्ठल हॉस्पिटलमध्ये प्रसूती दरम्यान शितल भाऊसाहेब करगळ (वय 28, रा. रावगाव, ता. करमाळा) या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तिचे पती भाऊसाहेब करगळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून न्यायालयाने डॉ. राम बिनवडे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, करमाळा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. महिलेच्या नातेवाईकांना हा गुन्हा दाखल करून घेण्यास तब्बल सात महिने लागले आहेत.

घडलेल्या घटनेनंतर नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. मात्र, पोलीस टाळाटाळ करत असल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने डॉक्टर बिनवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

पती भाऊसाहेब करगळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी पत्नी शितल करगळ ही डॉक्टर बिनवडे यांच्याकडे गर्भधारणेपासून नियमित उपचार घेत होती. 9 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.45 वाजता प्रसूतीसाठी विठ्ठल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी आई व बाळ दोघांची तब्येत ठणठणीत असल्याचे सांगत प्रसूती एक ते दीड तासात होईल, असे म्हटले होते. मात्र, अनेक तास उलटूनही प्रसूती झाली नाही. वेदना वाढत असताना डॉक्टरांनी गंभीरतेची माहिती न देता वेळ वाया घालवला.

सायंकाळी 5.30 च्या सुमारास शीतलवर सिजेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. बाळाची प्रकृती नाजूक असल्याने त्याला तत्काळ दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, शीतलला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. हॉस्पिटलने नातेवाईकांकडून सहा बॅग रक्त व चार बॅग प्लाज्मा घेतले, तरीही तिची प्रकृती खालावत गेली. नंतर डॉक्टर बिनवडे यांनी रुग्णाला पुढील उपचारासाठी मेक केअर हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे नेण्याचा सल्ला दिला. मात्र, तिथे दाखल करून घेण्यास नकार दिला गेला. अखेरीस शीतलला एशियन नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण तेथे तिचा मृत्यू झाला.

शस्त्रक्रियेनंतर शीतलने तिच्या आईला सांगितले होते की, डॉक्टरांनी आधीच्या ऑपरेशनचे टाके उसवून पुन्हा ऑपरेशन केले असून त्यामुळे ती त्रस्त होती व रक्तस्त्रावही खूप झाला होता.

पेशंट गंभीर स्थितीत असताना देखील डॉक्टरांनी आम्हाला सर्व काही ठीक आहे असे सांगितले. जवळपास पाच तास पेशंटला रखडून ठेवून महत्त्वाच्या क्षणी केलेल्या हलगर्जीपणामुळे शीतलचा मृत्यू झाला असल्याचा आरोप पती व इतर नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांना शिक्षा होऊन आम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा शितलचे वडील व पती यांनी केली आहे.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!