पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

केम(संजय जाधव): केम गावचे सुपुत्र व कोल्हापूर पोलीस दलातील उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे. हे पदक महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी, पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहे.

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने राज्यभरातून उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून प्रस्ताव मागवले जातात. यंदाच्या निवडीमध्ये करमाळा तालुक्यातील केम येथील सुपुत्र जालिंदर जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
जालिंदर जाधव यांचा प्रवास :
गरिबीच्या परिस्थितीतून मार्ग काढत जालिंदर जाधव यांनी केम येथे १२वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, तर पदवी शिक्षण इंदापूर येथे झाले. २००६ साली पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती झाल्यानंतर त्यांनी जुन्नर, बारामती, इंदापूर येथे सेवा बजावली. २०१८ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्यानंतर त्यांनी कडेगाव, विटा, खानापूर येथे यशस्वी सेवा दिली. सध्या ते कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत आहेत.

गुन्हे अन्वेषणातील उल्लेखनीय कामगिरी : 18 वर्षे 5 महिन्यांच्या सेवेच्या कालावधीत त्यांनी 171 बक्षिसे मिळवली असून, त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांवर उल्लेखनीय कारवाई केली आहे. त्यांनी एकूण 9 खून प्रकरणांत 21 आरोपींना अटक केली. अंमली पदार्थांच्या कारवाईत गांजा, एमडी, कोकेन असे विविध प्रकारांचे एकूण 106 किलो पेक्षा अधिक अमली पदार्थ पकडले.
दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपींकडून 2.16 लाखांचे साहित्य हस्तगत केले, तर जबरी चोरीप्रकरणी 25 लाख रुपये जप्त केले. घरफोडी प्रकरणात सोलापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील आरोपींना अटक करून एकूण 96.38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहन चोरी व जलमापक चोरीसंदर्भातही उल्लेखनीय तपास करत अनेक गुन्हे उघडकीस आणले.

गोवा बनावटीची दारू, बेकायदेशीर शस्त्रे आणि गुटखा वाहतूक यावरही प्रभावी कारवाई करत सुमारे 35 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून “लिलावर्ध गुणवंत कर्मयोगी पुरस्कार” आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून “उत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण 2024” सन्मान प्राप्त झाला आहे.


अभिनंदनाचा वर्षाव :
त्यांच्या या सन्मानाबद्दल केम व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माजी सरपंच अजितदादा तळेकर, प्रहारचे सदीप तळेकर, संचालक सागर दौड, अच्युत पाटील, विष्णू पारखे, आदिनाथ जाधव गुरुजी, आनंद शिंदे, बाळासाहेब देवकर, दिलीप दौड, दत्ता बिचितकर, बापुराव धाडस, मेजर सोमा गरदडे, योगेश जाधव, सागर राजे तळेकर, ओंकार जाधव, कृषी अधिकारी राजेंद्र तळेकर, समीरदादा तळेकर आणि उत्तरेश्वर गोडगे आदींनी जालिंदर जाधव यांचे विशेष अभिनंदन केले.


