लाडकी गाडी ! इलेक्ट्रिक गाड्यांना राज्यात टोलमाफी

करमाळा(दि.२): राज्य सरकारने पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या अखत्यारीतील टोलनाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आदी मार्गांवर ई-वाहन चालकांना टोल माफीचा लाभ मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादन आणि वापराला चालना देण्यासाठी आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. यामुळे ई-वाहनांच्या विक्री आणि वापरात मोठी वाढ होण्याचा सरकारचा विश्वास आहे.

तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील अन्य महामार्गांवर चार चाकी इलेक्ट्रिक वाहनांना टोलमध्ये 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. विद्युत दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, राज्य परिवहन उपक्रमाच्या बस आणि खाजगी बस यांना मूळ किमतीत 10 टक्के सवलत मिळणार आहे. तर इलेक्ट्रिक तीन चाकी मालवाहू वाहने, चार चाकी हलकी मालवाहू वाहने, शेतीसाठीचे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि कापणी यंत्रांना मूळ किमतीत 15 टक्के सवलत दिली जाणार आहे.

हे धोरण 2030 पर्यंत लागू राहणार असून, याच्या अंमलबजावणीसाठी येत्या पाच वर्षांसाठी 1993 कोटी रुपयांच्या निधीस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारने 2030 पर्यंत वाहतूक क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.




