करमाळा(दि.४ मे) : सीना नदीवरील पोटेगाव (ता.करमाळा) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम अखेर ३ मे ला सुरू झाले आहे. गेली अनेक वर्षे निधीअभावी प्रलंबित हे दुरुस्ती काम प्रलंबित होते. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीमुळे पोटेगावसह बाळेवाडी पोथरे, बिटरगाव श्री, तरटगाव आणि निलज या सहा गावांना लाभ होणार असून ८१५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
हा बंधारा १९९० मध्ये बांधून पूर्ण झाला होता. त्यानंतर गेले ३५ वर्षात याची पडझड, गळती आदी प्रकार झाल्याने त्याची दुरुस्ती होणे गरजेचे होते. तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे या भागातील शेतकऱ्यांनी बंधारा दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानंतर शिंदे यांनी या संदर्भात सिंचन विभागाकडे पत्र देऊन दुरुस्तीची मागणी केली होती. परंतु सिंचन विभागाच्या बजेटमध्ये निधी उपलब्ध नसल्याने त्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंत्यांना हा प्रस्ताव विस्तार सुधार योजनेतून सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार मुख्य अभियंता श्री. धुमाळ यांनी १५ सप्टेंबर २०२२ रोजी बंधाऱ्याची पाहणी केली आणि प्रस्ताव २५ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. जानेवारी २०२३ मध्ये नियामक मंडळापुढे हा प्रस्ताव मांडण्यात आला.
पुढील काही महिने हा विषय रखडला होता. त्यामुळे आमदार शिंदे यांनी ७ मार्च २०२३ रोजी जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली होती. अखेर नियामक मंडळाची बैठक २८ डिसेंबर २०२३ रोजी झाली आणि ४१२.९२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. जलसंपदा विभागाने ७ ऑगस्ट २०२४ रोजी ४ कोटी ८ लाख रुपयांच्या प्रशासकीय मंजुरीचा शासन निर्णय जारी केला.
त्यानंतर या कामाचे भूमिपूजन १४ ऑक्टोबर २०२४ रोजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते झाले होते. मात्र विधानसभेच्या आचारसंहितेमुळे प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकले नाही. निवडणुकीनंतर कामाला गती मिळाली नाही, परंतु पुन्हा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार ३ मे २०२५ रोजी प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.
पोटेगाव बंधाऱ्याची मूळ प्रशासकीय मान्यता २१ एप्रिल १९८१ रोजी २४.६१ लाख रुपये इतकी मिळाली होती. हे काम जानेवारी १९८८ मध्ये सुरू होऊन ऑगस्ट १९९० मध्ये पूर्ण झाले होते. १९९३ मध्ये हा प्रकल्प सिंचन व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतरित झाला. हा बंधारा खूप जुना झाला असल्याने त्याची दुरुस्ती करणे गरजेचे होते.
“माजी आमदार शिंदे यांच्या कार्यकाळात ३४९० कोटींचा विकास निधी मतदारसंघासाठी आणला गेला. त्यावेळी या विकासकामांना विरोधकांनी ‘कागदोपत्री’ संबोधले होते. आता मात्र तेच नेते पोटेगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रारंभ करताना श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत,”
विनय ननवरे, बोरगाव ता.करमाळा
पोटेगाव बंधाऱ्याची दुरुस्ती होणे अतिशय गरजेची होती. या कामामुळे निलज, बोरगाव, पोटेगाव, बाळेवाडी, बिटरगाव, पोथरे, आदी भागातून आनंदी आनंद साजरा होतांना दिसून येत आहे. आमची फक्त एकच विनंती असेल की काम खूप मोठे आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. नदीला पाणी येणाच्या अगोदर हे पात्रातील काम उरकून घ्यावे व पाणी अडवण्याचा मार्ग मोकळा करावा.