पाटबंधारे विभागाच्या भूमिकेवरून भरत अवताडे यांचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

करमाळा(दि.६) : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कामात अडथळा आणून बंद पाडणाऱ्यांविरोधात पाटबंधारे खाते पोलिसात तक्रार दाखल करत नाही त्यामुळे येत्या 16 मे रोजी अर्जुननगर फाटा येथे सकाळी 10 वाजता आपण रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भरत भाऊ अवताडे यांनी माध्यमांना दिली.

आधी याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, करमाळा तालुक्यातील 24 गावांची वरदायीनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या अपूर्ण कामांसाठी तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी 116 कोटी निधी मंजूर करून आणून त्याचे काम डिसेंबर 2023 मध्ये सुरू केलेले होते, परंतु नोव्हेंबर 2024 रोजी करमाळा तालुक्यात सत्तांतर झाले आणि त्यानंतर दहिगाव योजनेचे सुरू असलेले काम जानेवारी 2025 मध्ये बंद पडले. हे बंद पडलेले काम सुरू करावे या मागणीसाठी आपण पाटबंधारे विभागाला रीतसर पत्र दिले होते. काम सुरू न झाल्यास आपण जनआंदोलन उभे करू असा इशाराही दिलेला होता.परंतु पाटबंधारे विभाग याविषयी गळचेपी भूमिका घेत असल्यामुळे शेतकरी उध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे.
जानेवारी 2025 मध्ये बंद पडलेले दहिगाव योजनेचे काम एप्रिल 2025 अखेर सुरू झाले,परंतु हे काम पुन्हा एकाच दिवसात जेऊरच्या गावगुंडांनी येऊन बंद केले.

यासंदर्भात पाटबंधारे विभाग, करमाळा पोलीस स्टेशन या सर्वांना कल्पना आहे. पोलीस निरीक्षक यांचे सूचनेनुसार पोलिसांनी काम बंद पडलेल्या ठिकाणी जाऊन माहितीही घेतली परंतु दुर्दैवाने गुन्हा दाखल करण्यासाठी एकही कर्मचारी पुढे येत नाही. यापूर्वी जळीत पाईप प्रकरणात अज्ञातावरती गुन्हा दाखल केलेला होता असे असतानाही संबंधित गुन्हा दाखल करणारावरती प्रचंड दहशत दाखवली गेली. काम बंद पाडणारे गावगुंडांची नावे निष्पन्न झालेली आहेत ती पोलिसांकडे सुद्धा दिलेली आहेत .परंतु पाटबंधारे विभाग याविषयी तक्रार करायला पुढे येत नाही त्यामुळेच सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल होत नाही याचाच गैरफायदा लोकप्रतिनिधीने पोसलेले गावगुंड घेत आहेत. त्यामुळे येत्या 16 मे रोजी अर्जुननगर फाटा येथे सकाळी 10 वाजता आपण रास्ता रोको आंदोलन करणार आहे.

कंत्राटदार एस.बी.बिचितकर यांनी याविषयी माहिती देताना म्हणाले की, एका गाडीतून 6 गावगुंड आले व त्यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेची डावी वितरिका क्र.1 चे पांडे हद्दीत सबस्टेशन लगत सुरू असलेले काम 26 एप्रिल रोजी बंद पाडले. पोलीस पाहणी करून गेले. त्यांना गाडी नंबर व गाडीतील दोघांची ओळख पटलेली नावे दिलेली आहेत. परंतु पाटबंधारे विभाग मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे यायला तयार नाही.पाटबंधारे विभागाची हीच गळचेपी भूमिका शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे.



