म्हणूनच म्हणतात ‘शेतकरी राजा आहे’ – ऊस जळूनही चाऱ्यासाठी फुकट नेण्याचे आवाहन

करमाळा (दि.१२): शेतकऱ्याला शेतकरी राजा का म्हणतात याची अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी नुकतेच करमाळा तालुक्यातील भगतवाडी येथील विक्रम जाधव या शेतकऱ्याने शेतकरी कसा राजा आहे हे दाखवून दिले आहे.

गेल्या पाच दिवसाखाली अज्ञात व्यक्तीने त्यांचा एक एकर ऊस रात्रीचा पेटवून दिला. सकाळी शेतात गेल्यावर अर्धवट जळालेला ऊस पाहिला. आता या ऊसाचं करणार काय ? लगेच तो ऊस जनावरांना चाऱ्यासाठी उपयुक्त आहे म्हणून जाधव परिवाराने सोशल मिडीयावर आवाहन करून जळालेला ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी फुकट घेऊन जा.. असे आवाहन केले. ही बाब पाहिल्यानंतर शेतकरी हा निश्चितच राजा आहे हे सिध्द होते.


भगतवाडी येथील विक्रम जाधव यांच्या शेतात जवळपास पाच एकर ऊस आहे. गेल्या आठवड्यात एका माथेफिरूने या ऊसाला आग लावली. या आगीत एक एकर ऊस जळाला आणि त्यांच्या सुदैवाने चार एकर ऊस वाचला. त्यातच त्यांनी समाधान मानले. आता या ऊसाचं करणार काय ? त्यामुळे त्यांनी ज्यांना जनावरे आहेत, त्या जनावरांसाठी हा ऊस फुकट घेऊन जा..असे आवाहन केले आणि त्याला प्रतिसादही मिळाला.

या माथेफिरूने केवळ यांचा ऊसच पेटवला नाहीतर त्यांचे चुलते बजरंग कोंडीबा जाधव यांच्या केळीच्या फडातील ३५० केळीची रोपे कापून नुकसान केले आहे. अशा विघ्नसंतोषी लोकांचा शोध घेऊन पोलीसांनी तत्पर कारवाई करावी; असे आवाहन रोहित जाधव (९६२३१६२८२६) यांनी केले आहे.




